नाना पाटेकर त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अनेकदा कार्यक्रमांमध्ये, मुलाखतींमध्येही ते ठामपणे त्यांची मत मांडताना दिसतात. यामुळे अनेकदा ते चर्चेतही असतात. एकदा बॉलीवूड अभिनेते अनिल कपूर यांनी एका मुलाखतीत त्यांच्या याच स्वभावाबद्दल तक्रार करत सल्ला दिला होता.
Legends Unpluggedला दिलेल्या मुलाखतीत अनिल कपूर यांच्याशी २०२४मध्ये संवाद साधताना नाना पाटेकर यांनी त्यांच्या रागाबद्दल, स्पष्टवक्तेपणाबद्दल आणि बॉलीवूडच्या पार्ट्यांना न जाण्याबद्दल भाष्य केलं होतं. यावेळी त्यांनी यामागचं कारणही सांगितलं होतं. महत्त्वाचं म्हणजे अनिल कपूर यांनी त्यांना यावेळी सल्लासुद्धा दिला होता जो नाना पाटेकर यांनी नाकारला. बॉलीवूडच्या पार्ट्यांना का जात नाहीत असं विचारल्यानंतर त्यांनी दिलेल्या उत्तरातून त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची झलक दिसली. याचवेळी अनिल कपूर यांनी त्यांना त्यांच्या रागाबद्दल विचारलं.
नाना पाटेकर काय म्हणालेले
अनिल कपूर यांनी नाना पाटेकरांना विचारलं की, त्यांच्या अशा प्रतिक्रियांमागे त्यांचा रागीट स्वभाव कारणीभूत आहे का? यावर नाना पाटेकर म्हणाले, “हे रागाबद्दल नाही. जर कोणी तुमच्याशी गैरवर्तन केलं, तर साहजिकच त्याला त्याची किंमत मोजावी लागेल.” पुढे नाना पाटेकरांनी आपल्या स्वभावाबद्दल बोलताना म्हटलं, “आणि मी असा माणूस आहे की, अशा व्यक्तीला दोन फटके देण्याआधी मी दोनदा विचारही करणार नाही.”

अनिल कपूर यांनी दिला नाना पाटेकरांना सल्ला
यानंतर अनिल कपूर यांनी नाना पाटेकरांना वाद किंवा भांडण सोडवण्यासाठी प्रत्येक वेळी शारीरिक आक्रमकतेचा मार्ग अवलंबण्याची गरज नसल्याचं सांगितलं. “प्रत्येकाला मारायची गरज नसते मित्रा, प्रेमानेही समजावून सांगू शकता,” असं अनिल कपूर म्हणाले. यावर नाना पाटेकर म्हणाले, “समोरची व्यक्ती आधी प्रेम स्वीकारण्याच्या स्थितीत असायला हवी. जर तो पूर्णपणे दारूच्या नशेत असेल, तर तो प्रेम कसं स्वीकारणार?”.


दरम्यान, या कार्यक्रमात अनिल कपूर यांनी नाना पाटेकर यांना पार्टीला न जाण्याबद्दल प्रश्न विचारला होता. याबद्दल बोलताना नाना पाटेकर यांनी सांगितलं की, केवळ दारू प्यायची असेल तर त्यासाठी एखाद्या पार्टीला जाण्यात त्यांना रस नाही. ते स्वतःहूनही दारूचा आनंद घेऊ शकतात, असं त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय, अशा पार्ट्यांमध्ये काही अप्रिय व्यक्ती किंवा प्रसंग समोर आल्यास त्याचा आपल्या मूडवर लगेच परिणाम होतो, असंही नाना पाटेकर यांनी सांगितलं. याच संभाषणात त्यांच्या चर्चेत असलेल्या रागीट स्वभावाबाबतही चर्चा झाली होती.
