Nana Patekar Did Action Scenes In Fever : शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरीची मुख्य भूमिका असलेला ‘ओ’रोमिओ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचीसुद्धा मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांनी केलं असून सध्या ते चित्रपटाचे प्रमोशन करीत आहेत. अशातच त्यांनी प्रमोशनदरम्यान नाना पाटेककरांसंबंधित एक प्रसंग शेअर केला आहे.

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रकृती बरी नसूनही नाना पाटेकर यांनी एक अ‍ॅक्शन सीन कसा पूर्ण केला असल्याचं दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी सांगितलं. नाना पाटेकरांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. ‘ओ’रोमिओ’ मध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली असून, दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी त्यांच्या कामाचे कौतुक करत हा किस्सा सांगितला.

आजारी असूनही अ‍ॅक्शन सीन पूर्ण केला

चित्रपटातील ट्रेनवरील एका अ‍ॅक्शन सीनच्या शूटिंगबाबत विशाल भारद्वाज म्हणाले, “जेव्हा आम्ही ट्रेनमध्ये हा सीन शूट करत होतो, तेव्हा मला समजले की नाना सरांची प्रकृती बरी नाहीय. त्यांना १०२ ताप आहे. मग आम्ही लगेच डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यानंतर नाना सरांना शूटिंग न करण्याचा सल्ला दिला.”

नाना पाटेकर प्रकृती ठीक नसतानाही शूटिंग करण्यास तयार होते. पिपिंगमूनशी साधलेल्या संवादात विशाल भारद्वाज म्हणाले, “नाना सर म्हणाले की, मी हा सीन पूर्ण करणारच. माझ्यामुळे शूटिंग बंद व्हायला नको. त्यानंतर पुढील चार तास त्यांनी प्रकृती ठीक नसतानाही शूटिंग पूर्ण केलं.”

पुढे विशाल भारद्वाज म्हणाले, “त्यांचं शरीर तापाने इतकं गरम झालं होतं की त्यांच्या डोक्याला स्पर्श केला तरी चटके बसत होते. दोन शॉट्सदरम्यान ते सेटवरच आराम करायचे. नंतर पुन्हा शूटिंग करायचे, तेव्हा असं वाटायचं की हे आजारीच नाहीत. हेच एका खऱ्या कलाकाराचे कामाप्रति असलेलं समर्पण आहे.”

दरम्यान, शाहिद कपूर, तृप्ती डिमरी आणि नाना पाटेकरांचा ‘ओ’रोमियो’ ३ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहिद, तृप्ती आणि नाना पाटेकरांबरोबरच फरिदा जलाल आणि विक्रांत मॅसी हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.