७६ वर्षांचे नाना पाटेकर फिल्म इंडस्ट्रीत तर सक्रिय आहेतच, पण ते शेतात कामही करतात. ते गावातल्या फार्महाऊसवर राहतात आणि साधेपणाने आयुष्य जगतात. नाना फिट राहण्यासाठी काय करतात, ते आता समोर आलं आहे. त्यांचा वर्कआउट करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून जिममध्ये जाणारा कोणताही तरुण थक्क होईल. प्रसिद्ध फोटोग्राफर आणि प्रोड्यूसर अतुल कासबेकर यांनी इन्स्टाग्रामवर नानांचा ‘ट्रायसेप डिप्स’ (Tricep Dips) करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून चाहते अवाक झाले आहेत. या वयातही नाना इतक्या सफाईदारपणे वर्कआउट कसे काय करू शकतात, असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे.

अतुल कासबेकर यांनी पोस्ट केलेल्या या छोट्या रीलमध्ये नाना पाटेकर फिकट तपकिरी रंगाची शॉर्ट्स, पांढरी बनियान आणि गळ्यात गमछा अशा साध्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात थकवा दिसत नाहीये. नाना अत्यंत सहजतेने ट्रायसेप डिप्स मारत आहेत आणि व्यायाम पूर्ण झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर छान हसू उमटतं.

व्हिडीओ शेअर करत अतुल यांनी लिहिलं की, नानांनी एकूण १५ डिप्स मारले. “अहो नाना साहेब…!!! तुम्ही मला माझे फिटनेस गोल्स पुन्हा एकदा करायला भाग पाडलंय. हे आहेत नाना पाटेकर जी. त्यांचे वय ७६ वर्षे आहे. त्यांना ट्रायसेप डिप्स करताना पहा. त्यांनी एकूण १५ डिप्स मारले (मी रेकॉर्डिंग थोडे उशिरा सुरू केले). कधीकधी मी व्यायामाबाबत थोडा आळशी होतो, पण नाना साहेबांकडे पाहून पुन्हा जोमाने सुरुवात करावी लागेल. काय जबरदस्त व्यक्ती आहेत!”

पाहा नाना पाटेकरांचा व्हिडीओ

चाहत्यांनी विचारले नाना पाटेकरांच्या फिटनेसचे सिक्रेट

नानांचा हा व्हिडीओ पाहून चाहते त्यांच्या फिटनेसचे सिक्रेट विचारत आहेत. एका युजरने कमेंट केली की, “शुद्ध शाकाहारी असूनही नाना इतके फिट आहेत, आता अतुल तुम्ही सुद्धा शाकाहारी व्हायला हवे”, त्यावर अतुल कासबेकर यांनी उत्तर दिलं की, “मला सांगायला वाईट वाटतंय पण नाना शाकाहारी नाहीत. मी त्यांच्या घरी जेवलो आहे.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिलं, “ते स्वतः छान स्वयंपाक करतात आणि त्यांना मासं खायला खूप आवडतं. ते खरे लेजेंड आहेत.” ७६ व्या वर्षी नानांची ही ऊर्जा पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.

चाहत्यांनी केल्या मजेशीर कमेंट्स

नानांचा व्हिडिओ पाहून अनेकांना ‘वेलकम’ चित्रपटातील त्यांच्या ‘उदय शेट्टी’ या गाजलेल्या भूमिकेची आठवण झाली. एकाने गमतीत लिहिलं, “कंट्रोल उदय कंट्रोल!” तर दुसऱ्याने म्हटले, “उदय भाई अजूनही फिट दिसतायत.” अभिनेता मुझम्मिल इब्राहिम म्हणाली की त्यांना माझा नमस्कार सांगा.

नाना पाटेकरांचे अलिकडचे चित्रपट

नाना पाटेकरांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास २०२५ मध्ये ते अक्षय कुमार आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत ‘हाऊसफुल ५’ मध्ये झळकले होते. यावर्षी त्यांनी शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्यासोबत त्यांनी ‘ओ रोमियो’ चित्रपटात काम केलं. यात त्यांनी एका पोलिसाची भूमिका साकारली आहे. अनिल कपूरच्या ‘सूभेदार’ चित्रपटात त्यांनी छोटी भूमिका केली, तसेच ते एमएक्स प्लेयरच्या ‘संकल्प’ या सीरिजमध्येही दिसले.