Nana Patekar Angry On Director : आपल्या बिनधास्त आमि बेधडक भूमिकांमुळे चर्चेत राहणारे अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. आपल्या भूमिकांबरोबरच स्वभावामुळेसुद्धा ते चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या रागीट स्वभावाचे अनेक किस्सेही अनेकांनी सांगितले आहेत.

असंच एका चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर दिग्दर्शिकेवर संतापले होते. नाना पाटेकरांच्या या रागाचा किस्सा स्वत: दिग्दर्शिकेनेच सांगितला होता. या दिग्दर्शिका म्हणजे सई परांजपे. दिग्दर्शिका सई परांजपे यांनी १९९० मध्ये आलेल्या ‘दिशा’ चित्रपटात नाना पाटेकर यांच्याबरोबर काम केले होते. सई परांजपे यांना नानांच्या स्वभावाबद्दल आधीच माहीत होते; परंतु तरीही सई परांजपे यांनी ओम पुरी आणि शबाना आझमी यांच्याबरोबर नाना पाटेकरांनासुद्धा चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला.

मी नानाकडे दुर्लक्ष केल्याचं त्याला वाटलं असावं – सई परांजपे

फिल्मफेअरशी साधलेल्या संवादात सई परांजपे यांनी सांगितले होते, “मला आधी शबाना आणि ओम पुरी यांचे सीन शूट करायचे होते, ज्यात माझे दोन-तीन दिवस जाणार होते. त्यामुळे मी नानाला सांगितलं की, ‘तुझे सीन आता नाहीत, त्यामुळे तू नंतर ये’. त्यावर मला तो असं म्हणाला की, ‘माझे सीन नसले म्हणून काय झालं? चित्रपट तर माझा आहे. मी येणार’. त्यानंतर शबाना आणि ओम पुरी यांचे सीन करण्यासाठी मी त्यांच्याबरोबरच होते. तर त्यादरम्यान मी नानाकडे दुर्लक्ष केलं असल्याचं त्याला वाटलं असावं.”

Award Banner

चप्पल योग्य नसल्यावरून नानानं राग व्यक्त केला – सई परांजपे

पुढे त्यांनी सांगितलं होतं, “तीन दिवसांनी शबाना व ओम पुरी यांचं शूटिंग झालं आणि ते निघून गेले. मग मी नानाकडे आले. तर शूटिंगच्या दुसऱ्या दिवशी चप्पल योग्य नसल्याच्या छोट्याशा कारणावरून त्यानं राग व्यक्त केला. त्याचा तो राग पाहून सर्व जण स्तब्ध झाले. मी माझ्या आजवरच्या कारकिर्दीत असं कधी पाहिलं नव्हतं.” सई यांच्या मुलीची नाना पाटेकरांबरोबर चांगली मैत्री होती. त्यामुळे तिनेच नाना पाटेकरांना शांत करण्यास मदत केली होती.

डबिंगदरम्यान नानानं पानं फेकून दिली आणि… – सई परांजपे

पुढे सई यांनी सांगितलं होतं, “त्यानंतर पुन्हा एकदा नानानं असाच राग व्यक्त केला होता. तेव्हा सगळ्यांनी त्याची समजूत काढली होती. पण मग पुन्हा एकदा तिसऱ्यांदा डबिंगदरम्यान त्यानं पानं फेकून दिली आणि ‘मी हे असं करणार नाही’ असं म्हणाला होता. पण मग तेव्हा मात्र माझा पारा चढला. मी त्याला सांगितलं की, ‘बस्स झालं तुझं. तू असं का वागत आहेस? एक तर हे कर किंवा मग इथून बाहेर निघून जा.’ मला असं रागावलेलं पाहून सगळेच माझ्याकडे आश्चर्यानं बघत होते. त्यावर नाना मला म्हणाला, ‘मी जातोय आणि पुन्हा येणार नाही’. मीसुद्धा त्याला ‘जा, हेच योग्य आहे’, असं बोलले.”

“अर्ध्या तासानंतर नाना परत आला आणि मला म्हणाला, ‘तू सुरक्षित आहेस; कारण तू एक महिला आहेस. नाही तर तू इथे नसतीस’ आणि तो पुन्हा बाहेर गेला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी नाना शांत झाला आणि त्यानं फोन करून त्याचे डबिंग पूर्ण करण्यासाठी शिफ्टची वेळ विचारली. दुसऱ्या दिवशी तो अगदी चांगला होता”, असे शेवटी सई परांजपे यांनी सांगितलं होतं.