Nana Patekar Death News: भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू आणि दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गुरुवारी (८ ऑक्टोबर) हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र आणि बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी, ४ ऑक्टोबर रोजी नाना पाटेकर यांनी डोना पाउला येथील ‘सम्राट क्लब इंटरनॅशनल’च्या पदग्रहण समारंभाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी आपले जवळचे मित्र आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. या भाषणादरम्यान “उद्या मी इथे असेन की नाही हे मला माहीत नाही” असे उद्गार नानांनी काढले होते, आणि त्यानंतर अवघ्या चारच दिवसांत त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

“प्रमोद सावंत गोव्याचे मुख्यमंत्री आहेत. तुमच्या वडिलांच्या काळात मनोहर पर्रीकर माझे मित्र होते. त्यांना माझा मित्र म्हणताना मला अभिमान वाटायचा. ते माझ्यापेक्षा वयाने लहान होते, पण त्यांचं मोठेपण इतकं मोठे होते की आम्ही त्यांच्याकडे आदराने पाहायचो. आपल्या देशात अशा व्यक्तीचा जन्म झाला आणि त्यांनी देशासाठी, समाजासाठी कार्य केलं, हे आपलं नशीब होतं. ते एका ध्येयाने झपाटलेले होते. वसा घेतल्यासारखी जगलेली माणसं आहेत. इतक्या अल्प आयुष्यात इतकं सगळं करून जाणं किती मोठी गोष्ट आहे,” असं नाना पाटेकर या कार्यक्रमात म्हणाले होते.

उद्या मी असेन की नाही माहीत नाही – नाना पाटेकर

ते पुढे म्हणालेले, “आपल्या सर्वांनाच कधी ना कधी जावं लागणार आहे. उद्या मी इथे असेन की नाही हे मला माहीत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा तो एक काळ येणारच, पण त्यापूर्वी मी स्वतःला विचारलं पाहिजे, मला जे करायचंय ते मी करू शकतोय का? मी स्वतःला विचारलं पाहिजे की, मी प्रयत्न केले का? जर माझं जग फक्त माझी मुलं, माझी पत्नी आणि माझं घर इतकंच मर्यादित असेल, तर मग जग आणि मर. मला समाजाला काहीतरी परत दिलं पाहिजे, हो ना? मला नरेंद्र मोदींचे काही विचार आवडतात आणि काही आवडत नाहीत. आपण ते उघडपणे सांगायला शिकलं पाहिजे. त्यांचे प्रत्येक वक्तव्य किंवा काम चुकीचं नसतं. शेवटी विरोध म्हणजे तरी काय? जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला पटत नाही किंवा जशी व्हायला हवी तशी होत नाही, तेव्हा निषेध करणं असतं. लहान मूलसुद्धा भूक लागल्यावर रडतं, ती त्याची विरोध दर्शवण्याचीच पद्धत असते. वयानुसार विरोधाची व्याख्या बदलली पाहिजे, नाही का?”

विरोध करा, पण सभ्य भाषेत – नाना पाटेकर

पुढे नाना पाटेकर म्हणालेले, “जर मला एखादी गोष्ट आवडली नाही, तर मी त्याबद्दल नक्कीच बोललं पाहिजे. पण बोलण्याची एक विशिष्ट पद्धत असते. जर मला तुमच्याबद्दल काही बोलायचं असेल, तर मी घाणेरडे, शिवराळ किंवा आक्षेपार्ह शब्द वापरणार नाही. जाहीरपणे बोलताना राग आणि शिवीगाळ करू नका. मित्रांमध्ये आपण भांडू शकतो, एकमेकांना वाट्टेल ते बोलू शकतो, पण ते आपल्यापुरतंच असायला हवं. जेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी बोलतो, तेव्हा काही सभ्यता पाळलीच पाहिजे. ती टिकवून ठेवलीच पाहिजे, नाहीतर त्याला काहीही अर्थ उरत नाही,” असे नाना पाटेकर म्हणाले होते.