नाना पाटेकर त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जात असले तरी अनेकदा ते इतर कलाकारांबरोबर गंमतीशीर संवाद साधत त्यांची मस्करी करतानाही दिसतात. असंच एकदा त्यांनी माधुरी दीक्षितबरोबर मंचावर गंमतीशीर संवाद साधत उपस्थितांचं मनोरंजन केलं. त्यावेळी त्यांनी माधुरी दीक्षितला अनेक पुरस्कार मिळाले पण त्याना एकच मिळाला असंही म्हटलं होतं.

नाना पाटेकर व माधुरी दीक्षित दोघेही मनोरंजनविश्वातील लोकप्रिय कलाकार आहेत. दोघांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. अशातच एकदा पुरस्कार सोहळ्यात दोघांनी हजेरी लावली असताना नाना पाटेकर यांनी माधुरी दीक्षितबरोबर गंमतीशीर पद्धतीने संवाद साधला होता. फिल्मफेअरने सोशल मीडियावर या दोघांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये नाना पाटेकर ते माधुरी तब्बल २५ वर्षांनंतर भेटल्याचं सांगितलेलं. नाना पाटेकर माधुरीला नेमकं काय म्हणाले होते जाणून घेऊया.

नाना पाटेकर माधुरीला काय म्हणालेले

पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालन करत असलेला अभिनेता पुष्कर श्रोत्री नाना पाटेकर यांना “नाना काका बऱ्याच वर्षांनंतर हा दुर्मिल क्षण आम्हाला बघायला मिळत आहे काय सांगाल” असं विचारतो त्यावर नाना पाटेकर म्हणाले, “मगाशी मी आतमध्ये तिला म्हणालो की आपल्याला भेटून २५ वर्षे होऊन गेली. आता यानिमित्ताने भेटलो. एकदा तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्फेअरचाच पुरस्कार मिळाला होता.” नाना पाटेकर पुढे माधुरीला गंमतीत म्हणाले, “तुला आठवतंय का, तुला खूप मिळाले असतील मला एकच मिळाला म्हणून आठवतंय.” माधुरी नाना पाटेकरांचं हे वाक्य ऐकल्यानंतर हसायला लागली. २५ वर्षांनंतर माधुरी दीक्षित व नाना पाटेकर या पुरस्कार सोहळ्यात भेटले होते. तरीसुद्धा त्यांच्यातील बाँड तसाच असल्याचं जाणवलं.

नाना पाटेकर व माधुरी दीक्षित यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नाना पाटेकर यांना ‘परिंदा’, ‘अंगार’, ‘क्रांतीवीर’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. तर माधुरीला ‘दिल’, ‘दिल तो पागल है’, ‘हम आपके है कोण, बेटा यांसारख्या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला आहे.

दरम्यान, नाना पाटेकर व माधुरी दीक्षित यांनी आतापर्यंत काही हिंदी चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. यामध्ये ‘परिंदा’, ;वजूद’, ‘प्रहार’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.