Nana Patekar on Anil Kapoor: ‘राजू बन गया जेंटलमन’, परिंदा, वेलकम, वेलकम बॅक या सिनेमांत नाना पाटेकर व अनिल कपूर यांनी काम केले आहे. त्यांचे हे सिनेमे गाजले आहेत. वेलकम सिनेमातील मजनू भाई व उदय शेट्टी या त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या होत्या. या सिनेमातील अनेक डायलॉग लोकप्रिय ठरले, सिनेमातील कॉमे़डी लोकप्रिय ठरली. परिंदा सिनेमातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. त्यांनी एकत्र काम केलेले सिनेमे प्रचंड गाजले. खऱ्या आयुष्यातही त्यांच्यात उत्तम मैत्री असल्याचे पाहायला मिळते.

एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी अनिल कपूर यांच्याबद्दल वक्तव्य केले होते. २०२४ मध्ये नाना पाटेकरांनी द लल्लनटॉपला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांना इंडस्ट्रीमधील मित्रांबद्दल त्यांना विचारले होते. त्यावेळी त्यांनी अनिल कपूर यांचेंही नाव घेतले होते. ते असेही म्हणालेले की तो मला नियमितपणे फोन करतो.

“तो आजही खूप मेहनत…”

नाना पाटेकर पुढे म्हणालेले, “तो आजही खूप मेहनत करतो. खूप चांगले काम करतो. अॅनिमल सिनेमात त्याने उत्तम काम केले आहे. मी तो सिनेमा पाहिला. मी त्याला म्हणालो की मी तुझा सिनेमा पाहिला. त्यावर त्याने मला विचारले की कसा वाटला चित्रपट? मी म्हणालो की खूप चांगलं काम केलं आहेस. “

अनिल कपूर व नाना पाटेकर यांच्या मैत्रीत दुरावा आला होता, असे म्हटले जाते. १९८९ ला नाना पाटेकर व अनिल कपूर यांच्यातील वादाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या होत्या. परिंदा सिनेमातून नाना पाटेकरांना काढावे असे अनिल कपूर यांनी दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांना सांगितले, होते, असे नाना पाटेकरांनी म्हटले होते. याच मुलाखतीत नाना पाटेकरांनी त्याबद्दल वक्तव्य केले.

नाना पाटेकर म्हणालेले, “परिंदा सिनेमात जॅकी श्रॉफने जी भूमिका साकारली, ती भूमिका मी साकारणार होतो आणि अण्णा ही भूमिका नसरुद्दिन शाह साकारणार होते. पण, त्यांनी ती भूमिका साकारण्यास नकार दिला. मी आणि अनिलने खूप सराव केला होता. मी जवळजवळ सहा महिने तयारी केली होती. मी अलिकडेच अनिलला विचारले की तू विनोदला मला चित्रपटातून काढून टाक असं सांगितलं होतं का? त्यावर तो म्हणाला की मी विचार केला की नानाला का स्टार बनवू? जर तुम्ही जॅकीने साकारलेली भूमिका केली असती तर तुम्ही स्टार झाला असतात. मी त्याला म्हणालो की मी तुला म्हणालो होतो की मला कोणतीही भूमिका दिली तरी मी स्टार बनणार आहे. तुझ्याकडे कोणीही बघणार नाही.”

नाना पाटेकरांनी असेही सांगितले होते की मला चित्रपटातून काढले. पण, काही महिन्यानंतर विधू विनोद चोप्रा यांनी मला अण्णा या भूमिकेसाठी विचारले. सुरुवातीला मला राग आला पण नंतर मी ती भूमिका साकारण्यास होकार दिला.

दरम्यान, नाना पाटेकर व अनिल कपूर आगामी काळात कोणती भूमिका साकारणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.