Nana Patekar Neelkanti Patekar Love Story: बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नाना पाटेकरांच्या पत्नीचे नाव नीलकांती पाटेकर आहे. दोघांनी प्रेमविवाह केला होता, पण काही काळाने ते वेगळे राहू लागले. विशेष म्हणजे नाना पाटेकरांची आई सूनेबरोबर राहायची. तर नाना एकटेच वेगळे राहायचे.

नाना पाटेकरांनी एका मुलाखतीत त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी उघड केल्या होत्या. नाना आणि नीलकांती यांची पहिली भेट ‘जात न पुछो साधु की’ या नाटकादरम्यान झाली होती. त्याकाळी नानांना एका प्रयोगाचे केवळ ५० रुपये मिळायचे, तर नीलकांती बँकेत अधिकारी होत्या.

नाना पाटेकर व नीलकांती पाटेकर कुठे भेटले होते?

तुम्ही नीलकांती यांना केव्हा भेटला होतात? ‘जात न पुछो साधु की’ या नाटकावेळी का? असा प्रश्न नाना पाटेकर यांना द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर नाना पाटेकर म्हणाले, ”हो. तेव्हाच भेटलो होतो. ती नाटकात काम करायची, ती बँकेत अधिकारी होती. मला एका शोचे ५० रुपये मिळायचे आणि तिला अडीच हजार रुपये पगार होता. मी १५-२० शो केले तर ७५० रुपये व्हायचे. पूर्ण महिना ३० शो केले तर दुप्पट मिळायचे, पण तरीही १५०० मिळायचे. तिने मला म्हटलं होतं की तुम्हाला करिअर करायचं असेल तर करा, माझ्या पगारातून पैसे येतात. तिचे खूप उपकार आहेत. तिच्यामुळेच मी या प्रोफेशनमध्ये करिअर करू शकलो. त्यावेळी माहित नव्हतं यशस्वी होऊ की नाही.”

nana-patekar-wife-neelkanti-patekar-love-story-struggle-career
नाना पाटेकर व नीलकांती पाटेकर (फोटो – फेसबुक व इंडियन एक्सप्रेस)

नाना पाटेकर यांची पत्नी नीलकांती पाटेकर अभिनेत्रीही होत्या. त्यांनी सचिन पिळगांवकर यांच्याबरोबर एक सिनेमा केला होता. मग त्या अभिनयापासून दूर राहिल्या. “मल्हार होता, माझी आई होती, त्यामुळे तिने काम केलं नाही. मी वेगळा राहायचो, ते एकत्र राहायचे. आई, मल्हार व नीलकांती एकत्र राहायचे आणि मी एकटाच वेगळा राहत होतो,” असं नाना पाटेकर म्हणाले. नीलकांती यांनी वर्षभरापूर्वी आलेल्या ‘छावा’ सिनेमात बऱ्याच वर्षांनी अभिनय केला होता.

अवघ्या ७५० रुपयांत झालेले नाना पाटेकरांचे लग्न

नाना पाटेकर व नीलकांती यांच्या लग्नाचा एक खास किस्सा आहे. दोघांचे लग्न अवघ्या ७५० रुपयांत झाले होते. इतकंच नाही तर ते पुण्याला हनिमूनसाठीही गेले होते. नीलकांती यांनी फक्त एकाच चित्रपटात काम केलं होतं आणि त्यासाठी त्यांना राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला होता. त्यांनी नाना पाटेकरांना नेहमीच पाठिंबा दिला आणि त्यामुळेच नाना या क्षेत्रात करिअर करू शकले.

नाना पाटेकर व नीलकांती यांना मल्हार नावाचा मुलगा आहे. तो नानांबरोबर नाम फाउंडेशनची कामं करतो. त्याने ‘द लिटिल गॉडफादर’ चित्रपटात एक लहानशी भूमिका केली होती. राम गोपाल वर्मा यांच्या ‘द अटॅक्स ऑफ २६/११’ चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी मल्हारने सांभाळली होती.