Nana Patekar on Manisha Koirala: बॉलीवूडमधील काही कलाकारांच्या रिलेशनशिपची चर्चा वर्षानुवर्षे सुरू असते. अगदी ते कलाकार आपापल्या आयुष्यात पुढे गेले असले तरीही त्यांच्या नात्याबद्दल बोलले जाते. नाना पाटेकर व मनीषा कोईराला यांच्या नात्याबद्दल अनेकदा बोलले जाते.
नाना पाटेकर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांनी मराठीसह हिंदी सिनेमांतही काम केले आहे. त्यांचे अनेक सिनेमे गाजले आहेत. ‘तिरंगा’, ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘वेलकम’, ‘अग्नि साक्षी’, ‘शक्ती: द पॉवर’ अशा अनेक सिनेमांत त्यांनी काम केले आहे.
९०च्या दशकात नाना पाटेकर व मनीषा कोईराला यांच्या नात्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. काही रिपोर्ट्सनुसार, १९९६ ला प्रदर्शित झालेल्या ‘अग्नि साक्षी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. दोघांमध्ये वयाचे मोठे अंतर असूनही, त्यांच्या नात्याबद्दल बरीच चर्चा झाली. त्यांच्या नात्याबद्दल त्यांनी कधीही सांगितले नाही, मात्र शेवटी त्यांचे ब्रेकअप झाले असे म्हटले जाते. नाना पाटेकरांनी त्याबद्दल एका मुलाखतीत मनीषा कोईराला यांच्याबद्दल वक्तव्य केले होते.
“ती कस्तुरी मृगासारखी…”
‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणालेले, “मी ‘ग्रहण’ हा सिनेमा पाहिला. त्या चित्रपटात तिने अप्रतिम काम केले आहे. मनीषा टॅलेंडेट आहे. ती सध्याच्या अभिनेत्रींमध्ये सर्वांत संवेदनशील अभिनेत्री आहे. ती कस्तुरी मृगासारखी आहे. तिला कोणाशीही बरोबरी करण्याची गरज नाही, हे तिला अजून समजलेले नाही. तिच्याकडे सर्व काही आहे आणि ते तिच्यासाठी पुरेसे आहे. ती स्वतःबरोबर जे करत आहे, ते पाहून मला माझे अश्रू आवरणे कठीण होते. कदाचित मला आता तिच्याबद्दल काहीही बोलण्याचा अधिकार नाही. ती खूप लवकर नाराज होते. कदाचित तिच्या आधीच्या नात्यांमध्ये जे काही घडले आहे, त्यामुळे ती अशी वागत असेल.”
पुढे नाना पाटेकर असे म्हणालेले, “ब्रेकअप हा आयुष्यातील खूप अवघड काळ असतो. ते दु:ख समजून घेण्यासाठी तुम्हाला त्यातून जावे लागते. मी ज्या दु:खातून जात आहे, ते मी सांगू शकत नाही. प्लीज, आपण याबद्दल नको बोलूयात, मला मनीषाची आठवण येते.”
दरम्यान, नाना पाटेकर आगामी काळात कोणत्या सिनेमातून, भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
