Nana Patekar Struggle: नाना पाटेकर यांनी नुकतेच संकल्प या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते चर्चेत आहेत. तसेच, त्यांनी काही मुलाखतींमध्ये केलेले वक्तव्ये लक्ष वेधून घेत आहेत.

“वेळ आणि परिस्थिती जे शिकवते ते…”

‘जागरण’ला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर म्हणाले, “मी १३ व्या वर्षापासून नोकरी करण्यास सुरुवात केली. ८ किलोमीटर चालत जायचो आणि ८ किलोमीटर चालत यायचो. एकूण १६ किलोमीटर चालायचो. एका वेळचं जेवण मिळत असे आणि महिन्याचा पगार ३५ रुपये असायचा. पण, मी जीवनाचा आनंद घेतला. वेळ आणि परिस्थिती जे शिकवते ते कुठलीही शाळा शिकवू शकत नाही.”

या मुलाखतीत त्यांना विचारले की अनेकदा तुम्ही सेटवर जेवण बनवता. तर यावेळी शूटिंगदरम्यान कोणकोणते पदार्थ बनवले?त्यावर नाना पाटेकर म्हणाले, “सर्वसाधारणपणे जे बनवले जाते, तेच बनवले. पण, यावेळी जास्त जेवण बनवण्याकडे लक्ष दिले नाही. कारण, प्रकाश झा कामात व्यग्र ठेवत असत. त्यांची हिंदी अवघड आहे, त्यामुळे डायलॉग लक्षात ठेवावे लागायचे. होमवर्क करावा लागे.”

“…तर अपमान वाटतो”

पुढे ते म्हणाले, “खरे सांगायचे तर रीटेक करावा लागला तर अपमान वाटतो. या क्षेत्रात गेल्या ५० वर्षांपासून काम करत आहे. जर प्रकाश झा सीनचे शूटिंग झाल्यानंतर ओके म्हणाले आणि मी म्हणालो त्याच सीनचे शूटिंग पुन्हा एकदा करू तर ठीक आहे. पण, माझे शब्द इकडे तिकडे झाले त्यामुळे मला जर रीटेक घ्यावा लागला तर वाईट वाटते.”

जेव्हा त्यांना विचारले की सुबेदार चित्रपटात तुम्ही छोटी भूमिका का साकारली आहे? त्यावर नाना पाटेकर म्हणाले, “किती वेळाची भूमिका आहे, हे महत्वाचे नाही. अनिल कपूर मला म्हणाले की ही भूमिका करा. तर मी केली. त्यांनी मला विचारले की कोणती भूमिका आहे, हे का विचारले नाही. त्यावर मी म्हणालो की तुम्ही म्हणाला, म्हणून ही भूमिका मी साकारली आहे. एका मिनिटाची भूमिका आहे.”

“मला पैशांची गरज होती…”

प्रहार चित्रपटानंतर तुम्ही कोणत्या चित्रपटाचे दिग्दर्शन का केले नाही? यावर नाना पाटेकर म्हणाले, “मला पैशांची गरज होती. घर बांधायचे होते. दिग्दर्शनात खूप वेळ जातो. जर चित्रपट चालला नाही तर त्या कलाकारालासुद्धा पुढे काम मिळणे अवघड होते. दिग्दर्शकाची गोष्ट तर वेगळीच आहे. मी तो धोका पत्करू शकलो नाही. जेव्हा मी पैसे कमावू लागलो तो तेव्हा दिग्दर्शनाकडे लक्ष वळले नाही. जेव्हा मला चांगले दिग्दर्शक मिळाले, तेव्हा काही करायचे राहून गेले आहे, असे कधी वाटले नाही”, असे म्हणत नाना पाटेकर यांनी दिग्दर्शन का केले नाही, याबद्दल सांगितले.