Nana Patekar on Manisha Koirala: नाना पाटेकर यांचे हिंदी, मराठी सिनेमे गाजले आहेत. त्यांचे अनेक डायलॉग आजही लोकप्रिय आहेत. काही दिवसांपूर्वीच नाना पाटेकरांनी ‘संकल्प’ या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केले आहे.
नाना पाटेकर यांच्या भूमिका चर्चेत असतात असे नाही, तर त्यांची वक्तव्येदेखील चर्चेत असतात. एका जुन्या मुलाखतीत नाना पाटेकरांनी बॉलीवूड अभिनेत्री मनीषा कोईरालाबद्दल वक्तव्य केले होते.
९०च्या दशकात नाना पाटेकर व मनीषा कोईराला यांच्या नात्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. काही रिपोर्ट्सनुसार, १९९६ ला प्रदर्शित झालेल्या ‘अग्नी साक्षी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. दोघांमध्ये वयाचे मोठे अंतर असूनही, त्यांच्या नात्याबद्दल बरीच चर्चा झाली. त्यांच्या नात्याबद्दल त्यांनी कधीही सांगितले नाही, मात्र शेवटी त्यांचे ब्रेकअप झाले असे म्हटले जाते. नाना पाटेकरांनी त्याबद्दल एका मुलाखतीत मनीषा कोईराला यांच्याबद्दल वक्तव्य केले होते.
“ती स्वतःबरोबर….”
‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणालेले, “मी ‘ग्रहण’ हा सिनेमा पाहिला. त्या चित्रपटात तिने अप्रतिम काम केले आहे. मनीषाकडे उपजत प्रतिभा आहे. ती सध्याच्या अभिनेत्रींमध्ये सर्वात संवेदनशील अभिनेत्री आहे. ती एका कस्तुरी मृगासारखी आहे. तिला कोणाशीही बरोबरी करण्याची गरज नाही, हे तिला अजून समजायचे आहे. तिच्याकडे सर्व काही आहे आणि ते तिच्यासाठी पुरेसे आहे. ती स्वतःबरोबर जे करत आहे ते पाहून मला माझे अश्रू आवरणे कठीण होते. कदाचित मला आता तिच्याबद्दल काहीही बोलण्याचा अधिकार नाही. ती खूप लवकर नाराज होते. कदाचित तिच्या आधीच्या नात्यांमध्ये जे काही घडले आहे, त्यामुळे ती अशी वागत असेल.”
पुढे नाना पाटेकर असे म्हणालेले, “ब्रेकअप हा आयुष्यातील खूप अवघड काळ असतो. ते दु:ख समजून घेण्यासाठी तुम्हाला त्यातून जावे लागते. मी ज्या दु:खातून जात आहे, ते मी सांगू शकत नाही. प्लीज, आपण याबद्दल नको बोलूयात, मला मनीषाची आठवण येते.”
नाना पाटेकर व मनीषा कोईराला हे आपापल्या वैयक्तिक आयुष्यात पुढे गेले आहेत. मात्र, आजही त्यांच्या नात्याची अनेकदा चर्चा होते.
नाना पाटेकर आजही विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. मनीषा कोईराला सोशल मीडियावर सक्रिय असतात. विविध फोटो, डान्स व्हिडीओ शेअर करत त्या प्रेक्षकांची मने जिंकतात. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी’ वेब सीरिजमध्ये त्या प्रमुख भूमकेत दिसल्या होत्या. आता आगामी काळात हे दोन्ही लोकप्रिय कलाकार कोणत्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
