मनोरंजनविश्वात ‘मैत्री’ खूप महत्त्वाची… आपल्या जवळच्या मित्राने किंवा मैत्रिणीने दिलेला एक सल्ला आपलं पूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो. आजवर कित्येक कलाकारांनी आपल्या यशाचं श्रेय जवळच्या मित्रमंडळींना दिलं आहे. काही कलाकार असेही आहेत, ज्यांना त्यांच्या सुरुवातीच्या संघर्षाच्या दिवसांत जवळच्या मित्रांनी साथ दिलीये. मराठीसह हिंदी सिनेविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर सुद्धा दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यामुळे बॉलीवूडमध्ये आले. यामागचा किस्सा त्यांनी ‘बोलभिडू’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता.
मी सिनेमात काम करायला तयार नव्हतो. स्मितामुळे सिनेमात आलो. पहिला सिनेमा ‘गमन’ सुद्धा तिच्याबरोबर केला असं नानांनी सांगितलं. नाना पाटेकर यांनी १९७८ मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. ‘गमन’ चित्रपटातून ते रुपेरी पडद्यावर झळकले होते.
नाना पाटेकर याबद्दल सांगतात, “मी सिनेमात काम करायला तयारच नव्हतो. स्मिता नेहमी मला म्हणायची, तू सिनेमात काम केलं पाहिजेस नाना…चित्रपटात झळकलास तर तुला एकाचवेळी एवढ्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचता येईल. तू आता सिनेमात आलंच पाहिजेस अशी समजूत तिने काढली होती. पण, यादरम्यान मी तिला उलटं सांगायचो, मी म्हणायचो…अगं मी तिथे रमणार नाही…मला त्या नाटकाच्या चौकानात गेल्यावर अगदी राजा झाल्यासारखं वाटतं.”
“पण, स्मितामुळे मी चित्रपट करू लागलो. सिनेमा हे माध्यम इतकं मोठं आहे की, एकाचवेळी तुम्हाला एवढ्या लोकांशी कनेक्ट होता येतं. सत्यजित रे यांचं एक पान त्यांनी प्रकाशित केलं होतं. ज्यात त्यांनी नाना पाटेकरांबरोबर काम करायचंय असं लिहिलं होतं. हे सगळं अवॉर्ड्सपेक्षा मोठं आहे. मला तपन सिन्हांबरोबर काम करण्याचा देखील अनुभव मिळाला.” असं नाना पाटेकरांनी सांगितलं.
स्मिता पाटील यांनी नाना पाटेकरांना दिग्दर्शक रवी चोप्रा यांच्याकडे नेलं होतं. ‘गमन’नंतर त्यांनी ‘आज की आवाज’ मध्ये काम केलं. या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली आणि नाना पाटेकरांचा बॉलीवूडमधला प्रवास सुरू झाला.
दरम्यान, नाना पाटेकर यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, गेल्या काही महिन्यांमध्ये ते ‘ओ रोमिओ’, ‘सुभेदार’, ‘हाऊसफुल्ल ५’ यांसारख्या सिनेमांमध्ये झळकले आहेत. आता लवकरच ते लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘ईठा’ सिनेमात सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.
