Nana Patekar on Pankaj Tripathi: काही कलाकारांच्या अभिनयाचा चाहतावर्ग मोठा असतो. वर्षानुवर्षे त्यांनी साकारलेल्या भूमिकांची चर्चा होत असते. नाना पाटेकर व पंकज त्रिपाठी हे अशाच कलाकारांपैकी एक आहेत. या दोन्ही कलाकारांच्या अनेक भूमिका प्रचंड गाजल्या आहेत. त्यांच्या नवीन चित्रपटांची, त्यांना नवीन भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुकतेने वाट पाहत असतात.

नुकतीच नाना पाटेकर यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी पंकज त्रिपाठींबद्दल वक्तव्य केले आहे. नाना पाटेकरांच्या या वक्तव्याची सध्या चर्चा होत आहे. ते नेमकं काय म्हणाले आहेत, हे जाणून घेऊ…

“तू आधीपासूनच मोठा आहेस…”

नाना पाटेकर यांनी ‘न्यूज १८’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, “मी रजनीकांत यांच्याबरोबर काला हा चित्रपट करत होतो. त्यामध्ये पंकज त्रिपाठी पोलीस अधिकाऱ्याची खूप छोटी भूमिका करत होता. तेव्हा मी त्याला विचारलं की, तू हे काय करत आहेस? त्यावर तो म्हणाला की, एक छोटी भूमिका आहे. मी विचारलं की, तू अशा भूमिका का करत आहेस? त्यावर तो म्हणाला की, या चित्रपटात तुम्ही आहात, अण्णा(रजनीकांत) आहेत. मला तुमच्याबरोबर काम करायचे होते.”

नाना पाटेकर पुढे म्हणाले, “तू खूप मोठा अभिनेता आहेस. आमच्याबरोबर काम करून, तू मोठा होणार नाहीस. तू आधीपासूनच मोठा आहेस. पुन्हा अशा भूमिका केल्यास, तर मी तुला मार देईन.”

नाना पाटेकर व पंकज त्रिपाठी यांनी ‘काला’ चित्रपटाआधी आणखी एका चित्रपटात एकत्र काम केले होते. २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अपहरण’ चित्रपटात त्यांनी स्क्रीन शेअर केली होती. नाना पाटेकर यांनी हरिनाथ देसाई ही भूमिका साकारली होती. ही एक नकारात्मक भूमिका होती. तर पंकज त्रिपाठी एका पोलिसाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात के. मणिकंदन, दिलीपन, संपत राज, नितीश वीरा, रवी काले हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले होते.

रजनीकांत यांनी १९७५ ला सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. १९७८ मध्ये नाना पाटेकरांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. तर २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या रन या चित्रपटातून पंकज त्रिपाठी यांनी पदार्पण केले होते. या तीनही कलाकारांनी एकापेक्षा एक सिनेमांत काम केले आहे. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे.

नाना पाटेकर यांनी नुकतेच ओटीटीवर पदार्पण केले आहे. संकल्प या सीरिजमधून त्यांनी पदार्पण केले आहे. अमेझॉन एमएक्स प्लेअरवर ही १० भागांची सीरिज प्रदर्शित झाली आहे. त्याबरोबरच ते सुभेदार, ओ रोमिओ या चित्रपटात दिसले होते. दरम्यान, पंकज त्रिपाठी लवकरच ‘पारिवारिक मनोरंजन’ चित्रपटात दिसणार आहेत.