प्रकाश झा दिग्दर्शित ‘संकल्प’ या वेब सीरीजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या सीरिजबद्दल नाना पाटेकर व दिग्दर्शक प्रकाश झा यांनी गप्पा मारल्या. त्यांनी कलाकार व दिग्दर्शक यांच्यातील बदलत्या समीकरणाबद्दल मतं मांडली. दिग्दर्शक आणि अभिनेत्यांमधील संवाद कमी झाला आह आणि त्याचा थेट परिणाम चित्रपटांवर होतो, असंही त्यांनी नमूद केलं.
नाना पाटेकरांना विचारण्यात आलं की, ट्रेलर लॉन्चच्या वेळी तुम्ही म्हणाला होतात की, चित्रपटाबाबत तुमच्या सेक्रेटरीने दिग्दर्शकाशी बोललेलं तुम्हाला आवडत नाही. त्यावर नाना म्हणाले, “अरे सेक्रेटरी कसं बोलणार! काम मी करणार आहे ना. दिग्दर्शकाच्या मनात काय चाललंय हे मला माहित असायला हवं. माझा सेक्रेटरी सांगणार? माझी कंपनी प्रकाश झांना हे सांगणार का की नाना हा चित्रपट करत आहेत किंवा नाही? ते मला काय समजावणार?”
प्रकाश झा म्हणाले, “नाही, आज हिंदी चित्रपटसृष्टीची जी दुर्दशा झाली आहे, ती याच कारणामुळे आहे की अभिनेता आणि दिग्दर्शकामध्ये संवाद उरलेला नाही. जो कलाकृती तयार करतोय तो दिग्दर्शक आणि जो ती सादर करतोय त्यांच्यात संवादच नाही. संवादच संपला आहे. लेखकाने किंवा दिग्दर्शकाने काय लिहिलंय, त्याला काय म्हणायचंय, असे अनेक थर तयार झाले आहेत. आणि आता या थरांची कलाकारांमध्ये स्पर्धा लागली आहे.”
पुढे नाना पाटेकर म्हणाले, “अरे यार, मी जेव्हा सेटवर जातो, तेव्हा १० जण माझ्याबरोबर असतात. निर्माता पैसे देतो, याचा अर्थ असा नाही की मी त्याच्यावर सर्व भार टाकावा. माझ्यासोबत जे १०-१२ लोक असतात, त्या सर्वांचा खर्च निर्माताच उचलतो.” यावर प्रकाश झा म्हणाले, “ह्या अनौपचारिक गोष्टी आहेत, आपण याठिकाणी नको बोलायला.”
“कलाकारांच्या टीमचा निर्मात्यांवर भार कशाला?”
नाना पाटेकर प्रकाश झा यांना म्हणाले, “नाही, नाही, यात वादग्रस्त काहीच नाहीये. खर्चाच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की, मी त्याच्याकडून १०० रुपये घेतोय, तर माझ्याबरोबर १० लोक येवोत की १५, त्यांचे पैसे मी स्वतः देईन. ते मी तुला आधीच स्पष्ट करेन. मी दहाच्या ऐवजी बारा रुपये मानधन घेतोय, तर त्यातील वरचे दोन रुपये मी माझ्याबरोबरच्या लोकांसाठी घेतोय. मला वाटतं की सोबतच्या लोकांचा निर्मात्यांवर भार टाकणं हा अन्याय आहे.”
“डोळ्यांत चमक नाही अन् हे कसले स्टार्स?”
ते पुढे म्हणाले, “रात्री दोन वाजता जर मला काही अडचण आली, तर मी त्याला (दिग्दर्शकाला) फोन करून सांगू शकलो पाहिजे की, ‘प्रकाश, हे मला नीट समजत नाहीये.’ तो मोकळेपणा दोघांनाही असायला हवा. त्यानेही कधीही मला फोन करायला हवा. अभिनेता आणि दिग्दर्शक यांच्यात जर तो संवाद नसेल, तर काम करायला मजाच येणार नाही. सेटवर गेल्यावर विचारायचं, ‘हा सांगा, आता काय करायचंय?’ अरे, तुम्ही काही आकाशातून थोडीच पडला आहात! इतकी लायकी आहे तुमची? आपण बघतोच ना हल्ली कलाकारांच्या चेहऱ्यावर कसलेच भाव येत नाहीत, डोळ्यांत काहीच चमक नाही, अगदी कवडीसारखे डोळे करून बसतात आणि स्टार बनतात.”
पैसे तर ठिके, पण काही वेळेस कलाकारांच्या टीममधील लोक हस्तक्षेप करत असतात ते चुकीचं आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. दिग्दर्शकाशी कलाकार बोलला की विषय संपला, इतरांची गरजच नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, ‘संकल्प’ ही वेब सीरिज आज ११ मार्च रोजी एमएक्स प्लेयरवर रिलीज झाली. यात प्रकाश झा यांच्यासह अभिनेता झीशान अय्युबदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
