Nana Patekar Upcoming Movies : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आकस्मिक निधनाने सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. मराठी आणि हिंदी कलाविश्वामध्ये विविधांगी भूमिका साकारणाऱ्या नानांनी निधनापूर्वी काही सिनेमांचे शूटिंग पूर्ण करून ठेवले आहे. पुढील काही महिन्यांमध्ये नाना पाटेकर यांचे काही सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.
नाना पाटेकर यांनी ‘ईठा’ या श्रद्धा कपूरच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांसह काही सिनेमांचे शूटिंग पूर्ण केले होते. यामध्ये हॉरर-कॉमेडी, बायोपिक चित्रपटांपासून ते फेस्टिव्हल फिल्म असे नानांचे विविध प्रोजेक्ट लवकरच येणार होते. या सिनेमांत नाना पाटेकर यांनी काम केले असून लवकरच ते प्रदर्शित होणार आहेत. पण, नाना पाटेकर यांच्या निधनामुळे त्यांचे हे सिनेमे त्यांच्या चाहत्यांसाठी एक आठवण राहणार आहेत.
‘ईठा’
नाना पाटेकर हे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘ईठा’ या बायोपिकमध्ये दिसणार आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित या सिनेमात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असून रणदीप हुड्डा, अनंत जोशी आणि नाना पाटेकर यांच्याही यात भूमिका आहेत. नाना पाटेकर यांच्या भूमिकेबाबत खुलासा झाला नसला तरी हा सिनेमा येत्या ४ डिसेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
‘शक्ती शालिनी’
नाना पाटेकर हे आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘शक्ती शालिनी’ या हॉरर-कॉमेडी सिनेमाचा भाग असणार आहेत. अनित पड्डा आणि विशाल जेठवा यांच्याही भूमिका यात आहेत. या सिनेमाची कथा शक्ती नावाच्या एका सामान्य महिलेबाबत असणार आहे. सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली असून अद्याप नवी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
‘द कन्फेशन ऑफ मेरी’
नाना पाटेकर हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन यांच्या ‘द कन्फेशन ऑफ मेरी’ या सिनेमातही दिसणार आहेत. १९६६ मध्ये मेरीअक्कुट्टी नावाच्या कॅथलिक महिलेची हत्या झाली होती. या प्रकरणात एका धर्मगुरूवर हत्येचा आरोप ठेवून त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती; मात्र नंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाली. याच सत्यघटनेवर आधारित हा सिनेमा आहे. आदिल हुसेन, आशीष विद्यार्थी, गौतम रोडे, जॉय सेनगुप्ता, नेहा महाजन, पंखुरी अवस्थी आणि मीनाक्षी मार्टिन्स यांच्याही भूमिका यात आहेत. ‘द कन्फेशन ऑफ मेरी’चा प्रीमियर टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार आहे.

‘कुकू की कुंडली’
नाना पाटेकर हे शरण शर्मा दिग्दर्शित ‘कुकू की कुंडली’ या सिनेमातही दिसणार आहेत. या सिनेमात भुवन बाम आणि वामिका गब्बी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. कुंडलीमुळे एका प्रेमकहाणीमध्ये आणि दोन्ही कुटुंबांमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणींभोवती सिनेमाची कथा फिरते. या सिनेमाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
‘वेदांता’
नाना पाटेकर हे राजेश्वर पांडे राज दिग्दर्शित ‘वेदांता’ या सिनेमातही दिसणार आहेत. संदीपा धर, विक्रांत मॅसी आणि मुकेश तिवारी यांच्याही भूमिका यात आहेत. मात्र, सध्या या सिनेमाच्या कथानकाबाबत आणि प्रदर्शनाबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही.
