Nana Patekar Daily Routine in Village: दिग्गज अभिनेते नाना पाटेकर खऱ्या आयुष्यात खूप साधे जीवन जगतात. शूटिंग नसेल तेव्हा नाना पाटेकर गावी राहतात. एकदा ‘कौन बनेगा करोडपती १६’ मध्ये नाना यांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर गावाकडच्या आयुष्याबद्दल भरभरून गप्पा मारल्या होत्या. शूटिंग संपलं की मुंबईच्या झगमगाटातून दूर नाना आपल्या गावी डोंगरांच्या कुशीत निघून जातात. तिथे त्यांचं स्वतःचं जिम आहे, दोन गाई आणि एक बैल आहे. विशेष म्हणजे, नाना तिथे कोणावरही अवलंबून नसून स्वतःचा नाश्ता आणि जेवण स्वतःच बनवतात. त्यांच्या या साधेपणाचे आणि कामाप्रती असलेल्या निष्ठेचे बिग बींनीही भरभरून कौतुक केले होते.

नाना पाटेकरांना गावी राहायला फार आवडतं. शांत, निसर्गरम्य वातावरणात ते निवांत राहतात. बरेच सेलिब्रिटीही त्यांच्या घरी जातात. नाना पाटेकर स्वतःला गावाकडचा माणूस म्हणतात. अमिताभ बच्चन यांनी नाना पाटेकरांना ‘आपण गावातच राहायला हवं, असं तुम्हाला कधी वाटलं?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर “मी इंडस्ट्रीतला नाहीच, मी गावाकडचा माणूस आहे. मी इकडे काम करतो आणि परत गावी जातो. मी गाव-खेड्यात राहतो आणि तिथेच राहणार, तिकडेच मला बरं वाटतं,” असं उत्तर नाना पाटेकरांनी दिलं होतं.

अमिताभ बच्चन ८३ वर्षांचे आहेत. या वयातही ते उत्साहाने केबीसी होस्ट करतात, त्याचबरोबर चित्रपटांचे शूटिंगही करतात. याबद्दल नाना पाटेकर म्हणालेले, “मी अमिताभ बच्चन यांना विचारलं की, ‘तुम्ही इतकं काम का करता? गावात येऊन आठवडाभर राहा. तिकडे फार निवांत वाटतं. त्यावर त्यांनी मला सांगितलं की, ते दिवसातले १२ तास काम करतात. या वयात ते इतकं काम करू शकतात, य गोष्टीसाठी मी त्यांच्यापुढे खरंच नतमस्तक आहे.” यावर अमिताभ बच्चन म्हणाले होते की तुम्ही गावाकडे परत का गेलात, हे मी समजू शकतो.

नाना पाटेकरांकडे गाई व बैल आहेत

नाना पाटेकरांनी गावात त्यांची सकाळ कशी असते, त्याबद्दलही माहिती दिली होती. “मी सकाळी उठतो, तिकडे मी स्वतःचे एक जिम बनवले आहे. माझ्याकडे दोन गाई आणि एक बैल आहे. तिथे मीच सगळं काही करतो. नाश्ता, जेवण – माझं सगळं जेवण मीच बनवतो. मी खरंच चांगलं जेवण बनवतो. कधी कधी तर मला वाटतं की, जर मी चित्रपटांमध्ये करिअर करू शकलो नसतो, तर मी एक छोटेसे हॉटेल उघडले असते. पण, मी जितकी अपेक्षा केली होती, त्यापेक्षा आयुष्याने मला खूप जास्त दिलंय,” असं नाना पाटेकरांनी म्हटलं होतं.

nana patekar village life
नाना पाटेकरांचं गावातलं घर, अजित पवारांबरोबरचा फोटो (सौजन्य -मल्हार पाटेकर फेसबूक)

अलार्मसाठी घड्याळ लागत नाही, पक्ष्यांमुळे जाग येते – नाना पाटेकर

“माझ्या गरजा अगदी साध्या आहेत. संध्याकाळी, माझ्या सोबतीला पुस्तकं असतात. काही मी वाचली आहेत, काही वाचलेली नाहीत. चार पाच कपाटं भरून पुस्तकं आहेत. शहरात आपल्याकडे भिंती असतात, माझ्या गावात डोंगर आहेत. मी डोंगरांमध्ये राहतो. तिथलं आयुष्य खूप सोपं आहे. तिथे अलार्मसाठी घड्याळ लागत नाही. सकाळी पक्षी मला उठवतात. आमच्याकडे कधीकधी मोरसुद्धा येतात,” असं नाना पाटेकरांनी सांगितलं होतं.

नाना पाटेकर पुण्याजवळच्या डोणजे गावात राहतात. ‘नानाची वाडी’ नावाचं त्यांचं फार्महाऊस आहे. २७ एकरात पसरलेल्या या फार्महाऊसला अनेक सेलिब्रिटी भेट देतात. त्यांच्यासाठी नाना स्वतः जेवण बनवतात.