Nana Patekar and Anil Kapoor reunite: ‘वेलकम’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. अनिस बज्मी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. २००७ ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अनेक लोकप्रिय कलाकार दिसले होते. अॅक्शन आणि कॉमेडी या दोन्हींचे मिश्रण असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली होती.

या चित्रपटात मजनू आणि उदयभाई या पात्रांचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. ही पात्रे अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांनी साकारली होती. त्यानंतर वेलकम बॅक या सिनेमालादेखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता लवकरच वेलकम टू द जंगल हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामध्ये अनेक कलाकार दिसणार आहेत. मात्र, नाना पाटेकर आणि अनिल कपूर या सिनेमात दिसणार नाहीत. जेव्हा चित्रपटात कोण दिसणार आहे, हे समोर आले तेव्हा अनेकांनी त्याबद्दल प्रश्न विचारले होते. चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

मजनू आणि उदयभाई पुन्हा एकत्र दिसणार

आता जून २०२६ मध्ये वेलकम टू द जंगल हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वेलकम फ्रँचायजीचा हा तिसरा चित्रपट आहे. पहिल्या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. आता वेलकम टू जंगल हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘वेलकम ४’ची स्क्रिप्ट पूर्ण झाली असल्याचेही समोर आले आहे. विशेष बाब म्हणजे जरी ‘वेलकम टू द जंगल’मध्ये नाना पाटेकर आणि अनिल कपूर नसले तरी ‘वेलकम ४’मध्ये हे दोन्ही कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.

‘वेलकम ४’मध्ये डॉन उदय शेट्टीच्या भूमिकेत नाना पाटेकर, अनिल कपूर मजनूभाई व परेश रावल डॉक्टर घुंगरू या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

मिड डे(Mid-Day) रिपोर्टनुसार, ‘वेलकम टू द जंगल’पेक्षा ‘वेलकम ४’ची गोष्ट ही पूर्णपणे वेगळी असणार आहे. नाना पाटेकर, परेश रावल व अनिल कपूर यांच्या भूमिका मध्यवर्ती असणार आहेत. परेश रावल जरी ‘वेलकम टू जंगल’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असले तरी ते यामध्ये डॉक्टर घुंगरू या भूमिकेत दिसणार नाहीत.

डॉक्टर घुंगरू ही भूमिका त्यांनी २०१५ ला प्रदर्शित झालेल्या वेलकम बॅक या सिनेमात साकारली होती. ‘वेलकम बॅक’मध्ये नाना पाटेकर व अनिल कपूर यांनी ‘वेलकम’ सिनेमाप्रमाणेच उदयभाई व मजनूभाई भूमिका साकारली होती. मात्र, अक्षय कुमार व कतरिना कैफऐवजी जॉन अब्राहम व श्रुती हसन दिसले होते. डिंपल कपाडिया व नसिरुद्दीन शाह हे कलाकारदेखील ‘वेलकम बॅक’मध्ये दिसले होते. आता समोर आलेल्या माहितीनुसार, ‘वेलकम ४’मध्ये अनेक डॉन दिसणार आहेत.

परेश रावल यांनी एक्सवर हा रिपोर्ट रिपोस्ट करीत त्यावर जय हो, असे लिहिले. तर सुनील शेट्टी यांनीदेखील ‘वेलकम’च्या फ्रँचायजीमधील महत्त्वाचे कलाकार नाना पाटेकर, अनिल कपूर, परेश रावल हे पुन्हा एकत्र दिसणार आहेत. त्यांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी मी आनंदी अन् उत्सुक आहे.

‘वेलकम टू द जंगल’मध्ये जॅकी श्रॉफ, रवीना टंडन, अर्शद वारसी, तुषार कपूर असे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.