गायक-संगीतकार पलाश मुच्छल आणि क्रिकेटपटू स्मृती मानधना यांचं लग्न नोव्हेंबर २०२५ मध्ये होणार होतं. लग्नाआधीचे काही समारंभ झाले होते. पण लग्न मात्र अवघ्या एक दिवस आधी रद्द करण्यात आले. नंतर पलाशने स्मृतीची फसवणूक केल्याच्या बातम्या समोर आल्या. पण स्मृती व पलाश यांनी अधिकृत निवेदनात म्हटलं की स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने लग्न पुढे ढकलले. या लग्नासाठी सांगलीला गेलेला अभिनेता नंदिश संधू याने तिथे काय घडलं होतं, ते सांगितलं.

मिस मालिनीशी बोलताना, नंदिशने पलाशवरील फसवणुकीच्या आरोपांवर भाष्य करण्यास नकार दिला आणि म्हणाला, “यावर सध्या काही न बोललेलंच बरं. आणि पलाशला त्याची बाजू मांडू द्या.” पलाशवर आरोप होत आहेत, पण कोणीच त्याची बाजू ऐकून घेण्यासाठी त्याच्याशी संपर्क साधलेला नाही, असा दावाही नंदिश संधूने केला.

लग्न ढकलण्याचं कारण काय?

सांगलीत घडलेल्या घटनेची आठवण करून देत नंदिश म्हणाला, “मी लग्नासाठी गेलो होतो. पण ते लग्न झालं नाही. आणि मला तिथेच समजलं की हे लग्न होत नाहीये.” नंदीशने दिलेल्या माहितीनुसार, स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने हे लग्न पुढे ढकलण्यात आलंय, असंच सर्व पाहुण्यांना सांगण्यात आलं होतं. “लग्न पुढे ढकलण्यात आलं आणि त्याचं कारण जे बातम्यांमध्ये आलं होतं तेच होतं. सर्वांना तेच सांगण्यात आलं होतं. स्मृतीच्या वडिलांची प्रकृती ठीक नव्हती. ते रुग्णालयात होते. आणि म्हणूनच लग्न पुढे ढकलण्यात आले,” असं नंदिश संधूने सांगितलं.

लग्न रद्द झालं, याबद्दल वाईट वाटतंय असं नंदिशने म्हटलं. तसेच पलाशवरील आरोपांबद्दल बातम्यांमधून समजलं असा दावाही त्याने केला. “नंतर मला बातम्या आणि माध्यमांमधून समजलं की अशा गोष्टी बोलल्या जात आहेत. मला त्याबद्दल वाईट वाटतं,” असं नंदिश संधू म्हणाला.

दोघे एकमेकांच्या प्रेमात वेडे होते

नंदिशने पलाश व स्मृतीच्या नात्याबद्दलही भाष्य केलं. “लग्न मोडण्याचं कारण काहीही असो. पण खरं सांगायचं झाल्यास मी त्यांचं प्रेम पाहिलं आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून ते एकमेकांच्या प्रेमात किती वेडे होते, हे मी पाहिलं आहे. ते खूपच क्युट आणि छान कपल होते,” असं नंदिश संधू म्हणाला.

दरम्यान यापूर्वी, स्मृती मानधनाचा बालपणीचा मित्र असल्याचा दावा करणाऱ्या विज्ञान मानेने पलाशवर गंभीर आरोप केले होते. “मी त्या लग्नसमारंभात (२३ नोव्हेंबर, २०२५) हजर होतो. तेव्हा त्याला दुसऱ्या महिलेबरोबर अंथरुणात रंगेहाथ पकडलं होतं. ते सगळं खूप भयंकर होतं. भारतीय महिला क्रिकेटपटूंनी त्याला मारहाण केली होती. पलाशचे संपूर्ण कुटुंबच चोर आहे,” असं विज्ञान मानेने हिंदुस्तान टाइम्सला सांगितलं होतं.