Raj Kapoor Nargis Love Story: राज कपूर आणि नर्गिस या जोडीने १९५० च्या दशकात रुपेरी पडद्यावर एक सुवर्णकाळ गाजवला. ‘आवारा’, ‘श्री ४२०’, ‘बरसात’ अशा १६ ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये एकत्र काम करणाऱ्या या जोडीची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री खऱ्या आयुष्यातही प्रेमात बदलली. राज कपूर यांच्यावर नर्गिस यांचे जीवापाड प्रेम होते. आर. के. स्टुडिओ आर्थिक अडचणीत असताना नर्गिस यांनी स्वतःचे दागिने आणि कार विकून राज कपूर यांना खंबीर पाठिंबा दिला होता. मात्र, राज कपूर आधीच विवाहित असल्याने आणि पत्नी कृष्णा कपूर यांना घटस्फोट देण्यास तयार नसल्याने अखेर ९ वर्षांनंतर हे नातं तुटलं. या नात्याच्या शेवटच्या काळातील तणावामुळे नर्गिस पूर्णपणे कोलमडल्या होत्या आणि त्यांनी या नात्याचे वर्णन “भयानक स्वप्न” असे केले होते.
राज कपूर व नर्गिस यांची पहिली भेट आणि आर. के. फिल्म्सची सुरुवात
राज कपूर आणि नर्गिस यांची पहिली भेट १९४७ मध्ये झाली, जेव्हा राज कपूर त्यांच्या ‘आग’ या पहिल्या चित्रपटासाठी अभिनेत्रीच्या शोधात होते. नर्गिसचं वय त्यावेळी १६ वर्षे होतं. नर्गिसचं इंडस्ट्रीत मोठं नाव होतं. असं म्हटलं जातं की, राज कपूर जेव्हा नर्गिस यांच्या घरी त्यांना भेटायला गेले, तेव्हा नर्गिस स्वयंपाक करत होत्या आणि गडबडीत गालाला बेसन लागलेल्या अवस्थेतच त्या बाहेर आल्या. राज कपूर नर्गिस यांच्या याच साधेपणावर आणि रूपावर भाळले. पुढे हाच प्रसंग त्यांनी आपल्या ‘बॉबी’ (१९७३) या चित्रपटात ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांच्या पहिल्या भेटीच्या दृश्यासाठी वापरला.
१६ चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं
राज कपूर व नर्गिस या जोडीने एकत्र जवळपास १६ चित्रपटांमध्ये काम केले. यात आवारा, श्री ४२०, बरसात, चोरी चोरी आणि आग यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा समावेश आहे. त्यांच्यातील पडद्यावरील केमिस्ट्री इतकी जिवंत असायची की, प्रेक्षक त्यांना खऱ्या आयुष्यातही पती-पत्नीच मानू लागले होते. ‘आर. के. स्टुडिओ’चा जो प्रसिद्ध लोगो आहे, तो राज कपूर आणि नर्गिस यांच्या बरसात चित्रपटातील एका दृश्यावरूनच प्रेरित आहे.
खऱ्या आयुष्यात वाढली जवळीक
पडद्यावर रोमान्स करणारी ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या अत्यंत जवळ आली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे होते. नर्गिस यांनी केवळ राज कपूर यांच्यावर प्रेमच केले नाही, तर आर. के. फिल्म्सच्या उभारणीत आर्थिक पाठिंबा दिला. जेव्हा आर. के. स्टुडिओ आर्थिक अडचणीत होता, तेव्हा नर्गिस यांनी स्वतःचे दागिने आणि कार विकून राज कपूर यांना मदत केली होती.
विवाहित होते राज कपूर
राज कपूर यांचे आधीच कृष्णा कपूर यांच्याशी लग्न झाले होते आणि त्यांना मुलंही होती. राज कपूर आपल्या कुटुंबाला सोडायला तयार नव्हते, तर दुसरीकडे नर्गिस यांना राज कपूर यांच्याशी लग्न करून कायदेशीर पत्नी व्हायचे होते. नर्गिस यांनी नऊ वर्षे राज कपूर यांची वाट पाहिली. असं म्हणतात की, नर्गिस यांनी त्या काळातील कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन विवाहित पुरुषाशी लग्न कसे करता येईल, याचे मार्गही शोधले होते; पण राज कपूर यांनी कृष्णा कपूर यांना घटस्फोट देण्यास नकार दिला.
राज कपूर व नर्गिस यांच्या नात्याचा शेवट
अखेर, राज कपूर कधीच लग्न करणार नाहीत हे लक्षात आल्यावर नर्गिस अत्यंत निराश झाल्या. १९५६ मध्ये आलेल्या चोरी चोरी आणि जागते रहो या चित्रपटांनंतर त्यांनी राज कपूर आणि आर. के. स्टुडिओबरोबर काम करणं थांबवलं.
यानंतर १९५७ मध्ये मदर इंडिया चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर भीषण आग लागली. या आगीतून सुनील दत्त यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून नर्गिस यांचे प्राण वाचवले. या घटनेनंतर नर्गिस सुनील दत्त यांच्या जवळ आल्या. सुनील दत्त यांच्या खऱ्या प्रेमाने नर्गिस यांच्या मनातील राज कपूर यांच्या विरहाचे दुःख कमी केले आणि १९५८ मध्ये नर्गिस व सुनील दत्त यांनी लग्न केले.
राज कपूर यांच्याबद्दल नर्गिस काय म्हणाल्या होत्या?
नर्गिस यांनी म्हटलं होतं की राज कपूरबरोबरचं त्यांचं नातं शेवटच्या दिवसांत अत्यंत तणावपूर्ण झालं होतं. नर्गिसने या नात्याचं वर्णनआयुष्यातील एक “भयानक स्वप्न” असं केलं होतं. हे नातं वाचवण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले होते, पण परिस्थिती सतत बिघडत चालली होती.
नर्गिसच्या मते, त्यांचं प्रेम एका अशा सुंदर रोपट्यासारखं होतं ज्याला बहरायचं होतं, पण ज्या मातीत ते रोपटं होतं, त्या मातीतच विष कालवलं गेलं होतं. नात्याच्या शेवटच्या काळात नर्गिसला आतून पूर्णपणे तुटल्यासारखं वाटत होतं आणि यामुळेच दुःखी असल्याचं त्यांनी मान्य केलं होतं.
