चित्रपटसृष्टीत करिअर करण्याची इच्छा बाळगत अनेकजण मुंबईत येतात. ते मुंबईत राहतात आणि संघर्ष करतात. यादरम्यान त्यांना बरेच विचित्र अनुभव येतात. ‘रॉकस्टार’ फेम अभिनेत्री नर्गिस फाखरीच्या बाबतीतही असंच घडलं होतं. नर्गिसला मुंबईत आल्यावर काही धक्कादायक अनुभव आले होते. सुरुवातीला ती भाड्याच्या घरात राहत होती, मग नंतर तिने मुंबईत स्वतःचं घर घेतलं. पण ती या घरात फक्त तीन दिवस राहू शकली होती. कारण तिला त्या घरात विचित्र भास झाले होते.

नर्गिसला त्या घरात राहताना विचित्र स्वप्ने पडायची. तसेच ते घर सोडताना तिला एक विचित्र अनुभव आला होता. तो तिने स्वतः सांगितलं. त्या घरात जे घडत होतं ते सगळं समजण्यापलिकडचं होतं, असं नर्गिस फाखरी म्हणाली होती. नर्गिस फाखरी मुंबईत नवीन असताना काय घडलं होतं, ते जाणून घेऊयात.

नर्गिसला पडलेलं भयंकर स्वप्न

“मी मुंबईत स्वतःच घर घेतलं तेव्हा मी खूप आनंदी होते, कारण ते घर मी स्वतःच्या मेहनतीने घेतलं होतं. ते माझं घर वांद्रे भागातील हिल रोडवर स्मशानभूमीच्या जवळ होतं. पण त्या घरात मी फक्त तीन दिवस राहू शकले होते. कारण तिथे मला खूप विचित्र स्वप्नं पडायची आणि अचानक रात्री-अपरात्री जाग यायची. ती स्वप्ने खूप भीतीदायक होती. एक भुतासारखा पांढरे कपडे घातलेला सहा फूट उंच माणूस मला स्मशानभूमीत घेऊन गेला. त्याने स्मशानात हाताने जमीन खणली, मग मृतदेह बाहेर काढून त्यावरील मांस खाऊ लागला. तो मलाही मांस खायला सांगायचा. मला सलग तीन दिवस हे स्वप्न पडलं,” असं नर्गिस फाखरीने सांगितलं होतं.

नर्गिसला आलेला आणखी एक विचित्र अनुभव

पुढे नर्गिस म्हणाली, “मला रोज रात्री अशी भीतीदायक स्वप्ने पडायची आणि मी मध्यरात्री ३ वाजता मी झोपेतून जागी व्हायची. मला रोज स्वप्नात विचित्र माणूस दिसायचा. त्याची उंची ६ फूट ५ इंच असेल.” अशा विचित्र अनुभवानंतर नर्गिसने ते घर सोडायचं ठरवलं.

नर्गिसने तिच्या टीमला दिल्लीला शिफ्ट व्हायला सांगितलं. कारण नंतर तिला कपाटाजवळ ६ मृत पक्षी आढळले होते. लोक सामान पॅक करायला आले तेव्हा तिला हे पक्षी दिसले आणि इतक्या विचित्र गोष्टी पाहून नर्गिस गोंधळली. हे सगळं का घडतंय, हेच समजत नव्हतं असं तिने सांगितलं होतं.

नर्गिस फाखरीच्या करिअरची सुरुवात

नर्गिस फाखरीचा जन्म अमेरिकेत झाला. तिचे वडील पाकिस्तानी व आई अमेरिकन होती. नर्गिस ६ वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. नर्गिसचे बालपण न्यूयॉर्कच्या ‘क्वीन्स’ भागात अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. वयाच्या १६ व्या वर्षी तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली. त्यानंतर ती ‘अमेरिकाज नेक्स्ट टॉप मॉडेल’ सारख्या रिॲलिटी शोमध्ये दिसली आणि मॉडेलिंग विश्वात तिने स्वतःची ओळख निर्माण केली.

नर्गिस फाखरीचे बॉलीवूड चित्रपट

नर्गिस फाखरी चित्रपटांमध्ये करिअर करायला भारतात आली. २०११ साली इम्तियाज अलीचा ‘रॉकस्टार’ हा तिचा पहिला चित्रपट होता. यात रणबीर कपूरची मुख्य भूमिका होती. पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला आणि नर्गिसला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने मैं तेरा हीरो, ‘मद्रास कॅफे’, ‘अजहर’, हाऊसफुल्ल ३ सह इतर अनेक चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या.