बॉलिवूडमध्ये अशा अनेक लव्ह स्टोरी आहेत, ज्यांची आजही आवर्जून चर्चा होते. ९०च्या काळातही इंडस्ट्रीतील अनेक कलाकार त्यांच्या प्रेमकहाणीमुळे चर्चेत असायचे त्यापैकीच एक म्हणजे सुनील दत्त आणि नर्गिस दत्त. कामानिमित्त भेट झाल्यानंतर त्यांची ओळख झालेली आणि सेटवर एकत्र काम करताना त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. पण, अनेकांना माहीत नसेल की लग्नानंतरही हे दोघे वेगळे राहत होते.
१९५० च्या दशकात ‘दो बीघा जमीन’ चित्रपटाच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली. त्यानंतर ‘मदर इंडिया’च्या चित्रीकरणादरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि १९५८ मध्ये विवाहबंधनात अडकले. मात्र, लग्नानंतरही नर्गिस आणि सुनील दत्त काही काळ वेगवेगळ्या घरात राहत होते, ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांनी असा निर्णय का घेतला होता, जाणून घेऊया.
…म्हणून लग्नानंतरही राहत होते वेगळे
‘हिंदुस्तान’च्या एका अहवालानुसार, ‘मदर इंडिया’ चित्रपटात नर्गिस आणि सुनील दत्त यांनी आई-मुलाची भूमिका साकारली होती. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र, त्यांच्या नात्याबद्दल कोणालाही माहिती नव्हती. त्यांच्या रिलेशनशिपबद्दल कळल्यानंतर त्याचा चित्रपटाच्या यशावर परिणाम होऊ शकला असता, अशी भीती होती. त्यामुळे चित्रपट पूर्ण होईपर्यंत आणि माध्यमांचं लक्ष टाळण्यासाठी दोघांनी त्यांचं नातं लपवून ठेवण्याचा निर्णय घेतला. यानंतर १९५८ मध्ये नर्गिस आणि सुनील दत्त यांनी गुपचूप लग्न केलं, मात्र लग्नानंतर जवळपास वर्षभर त्यांनी हे कोणालाही सांगितली नव्हती.
नर्गिस आणि सुनील दत्त यांनी लग्न केल्यानंतरही काही काळ वेगवेगळ्या घरांमध्ये राहणं पसंत केलं. त्यांच्या लग्नाची माहिती कोणालाही नव्हती, त्यामुळे दोघेही रात्रीच्या वेळी गुपचूप भेटत असत. त्याकाळी मोबाईल फोन नसल्यामुळे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी ते पत्राचा आधार घेत असत. अखेर १९५९ मध्ये नर्गिस आणि सुनील दत्त यांनी त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केली आणि त्यानिमित्ताने एका रिसेप्शनचंही आयोजन केलं. त्यानंतर दोघे कायमचे एकत्र राहू लागले.
राज कपूर यांच्याशीही होते प्रेमसंबंध
सुनील दत्त यांच्याशी लग्न करण्यापूर्वी नर्गिस आणि राज कपूर यांच्या प्रेमप्रकरणाची बॉलिवूडमध्ये मोठी चर्चा होती. अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांचं नातं अधिक घट्ट झालं. असं म्हटलं जातं की, नर्गिस यांना राज कपूर यांच्याशी लग्न करून संसार थाटायचा होता. मात्र राज कपूर यांचं आधीच कृष्णा कपूर यांच्याशी लग्न झालं होतं आणि पत्नीला घटस्फोट देण्यास ते तयार नव्हते. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर नर्गिस यांनी राज कपूर यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात सुनील दत्त आले आणि पुढे दोघांनी लग्न करून नव्या आयुष्याची सुरुवात केली.
आरके फिल्म्सच्या अनेक चित्रपटांमध्ये सलग काम केलेल्या नर्गिस यांनी ‘मदर इंडिया’ हा चित्रपट स्वीकारल्यानंतर, राज कपूर यांना त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची जाणीव झाली, असं म्हटलं जातं. यानंतर नर्गिस यांच्या आयुष्यात सुनील दत्त यांची एंट्री झाली. दोघे ‘मदर इंडिया’च्या चित्रीकरणादरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले आणि अखेर १९५८ मध्ये गुपचूप विवाहबंधनात अडकले.
