Nauheed Cyrusi Miscarriage : आई होणं हा तर प्रत्येक स्त्रीसाठी एक अद्भूत अनुभव असतो. पण, प्रत्येक स्त्रीला आई व्हायचंच असतं असं नाही. सध्याच्या काळामध्ये अनेक महिला या स्वतःच्या इच्छेने मातृत्व स्वीकारत नसल्याचं समोर आलं आहे. अनेकदा याबाबत अभिनेत्री मुक्तपणे संवाद साधताना दिसून येतात. याबाबत बॉलीवूडमधील आणखी एका अभिनेत्रीने तिचे अनुभव सांगितले आहेत.
अभिनेत्री व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नौहीद सायरसीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने मातृत्वाबद्दल तिचे विचार मांडले आहेत. या व्हिडीओमध्ये नौहीदने तिचा दोन वेळा गर्भपात झाल्याचा पहिल्यांदाच खुलासा केला आहे. यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला असून अनेकांनी तिच्याविषयी सहानुभूती व्यक्त केली आहे. दोन वेळा गर्भपात झाल्यानंतर तिचा आणि तिच्या पतीचा आयुष्याकडे आणि मातृत्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याचे नौहीद सायरसीने सांगितले आहे.
दुर्दैवाने तिसऱ्या महिन्यात गर्भपात – नौहीद सायरसी
सोशल मीडियावर नौहीद सायरसीला एका चाहत्याने मेसेज करून, ‘तुला मुलं का नको आहेत,’ असा प्रश्न विचारला आहे. यावर तिने व्हिडीओ शेअर करीत तिचे अनुभव आणि मत व्यक्त केले. ती म्हणाली, “आमचं २०१७ मध्ये लग्न झालं होतं. त्यानंतर २०१८ मध्ये मी पहिल्यांदा गरोदर राहिले, पण दुर्दैवाने तिसऱ्या महिन्यात माझा गर्भपात झाला. शेवटच्या तपासणीसाठी आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो, तेव्हा बाळाच्या हृदयाचे ठोके बंद झाल्याचं समजलं. डॉक्टरांनी मला ही बातमी कुटुंबीयांना सांगायला सांगितलं. त्यानंतर आम्ही ‘जोजो’ला दत्तक घेतलं. तो कॉकर जातीचा श्वान असून त्याला दिसत नाही आणि त्याला ऐकायलाही येत नाही, आम्ही त्याला एसपीसीएमधून दत्तक घेतलं.”
पुढे ती म्हणाली, “करोनाच्या काळात मी दुसऱ्यांदा गरोदर राहिले, पण त्यावेळीही गर्भपात झाला. त्यानंतर आम्ही आमच्या आयुष्याचा उद्देश काय आहे याचा विचार करायला सुरुवात केली. फक्त मुलांना जन्म देणं हाच आयुष्याचा उद्देश असू शकत नाही, असं आम्हाला वाटलं. आपण जशा वातावरणामध्ये वाढलो तसं आताचं जग राहिलेलं नाही हे तुम्हालाही मान्य करावं लागेल, त्यामुळे आम्ही मुलांऐवजी गरजू प्राण्यांची काळजी घेण्याचा निर्णय घेतला.”
IVF उपचार घेऊन आई व्हायचं नव्हतं – नौहीद सायरसी
नौहीद पुढे म्हणाली, “कदाचित आमच्या आयुष्याचा उद्देश हा मुक्या प्राण्यांची काळजी घेणं हाच असावा. कारण अशा अनेक प्राण्यांना आमची आणि आमच्या प्रेमाची गरज आहे. अनेक वर्षांपासून मी आणि माझा पती प्राण्यांसाठी काम करत आहोत; पण याबद्दल फारसं कोणाला माहिती नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला आयव्हीएफ उपचार घेऊन आई व्हायचं नव्हतं. मला असं वाटत होतं की, जर एखादं मूल आमच्यासाठीच असेल तर ते आमच्या आयुष्यात नक्की येईल, त्यामुळे मला आयव्हीएफच्या मार्गाने जायचं नव्हतं. आता माझं वय चाळिशीच्या पुढे आहे आणि मी आयुष्याच्या वेगळ्या टप्प्यात आहे, त्यामुळे या सगळ्या चर्चांना आता पूर्णविराम मिळेल अशी अपेक्षा आहे.”
नौहीद सायरसी २०१७ मध्ये केला विवाह
अभिनेत्री नौहीद सायरसीने तिच्या अभिनय व सौंदर्याने सिनेविश्वात वेगळी ओळख निर्माण केली. ‘अनवर’ चित्रपटातील तिची भूमिका विशेष गाजली. यानंतर तिने ‘अग्गर’, ‘भूतनाथ’, ‘कुर्बान’ आणि ‘जय हो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नौहीद सायरसीने २०१७ मध्ये उद्योगपती रुस्तम कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर तिने सिनेविश्वातून ब्रेक घेत वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य दिलं आहे. आता नौहीद सायरसी आणि तिचा पती हे मिळून विशेष प्राण्यांची काळजी घेत असतात आणि त्यांचं संगोपन करतात.
