Nawazuddin Siddiqui Autobiography Controversy ‘An Ordinary Life’. नवाजुद्दीन सिद्दीकीने पुस्तकात ‘मिस लव्हली’ चित्रपटातील सह-कलाकार निहारिका सिंहसोबतच्या नात्याबद्दल अत्यंत खासगी खुलासे केले होते. स्वतःला ‘वासनांध ग्रामीण माणूस’ म्हणवून घेणाऱ्या नवाजुद्दीनवर निहारिका सिंह आणि सुनिता राजवार यांनी खासगी आयुष्याचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप केला. वाद वाढल्यानंतर आणि कायदेशीर अडचणी निर्माण झाल्यानंतर नवाजुद्दीनने सर्वांची माफी मागत हे वादग्रस्त आत्मचरित्र मागे घेतले होते.
नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याच्या ‘अॅन ऑर्डिनरी लाईफ’ या आत्मचरित्रात निहारिका सिंहबरोबरच्या अफेअरबद्दल लिहिलं होतं. तिने घरात रोमँटिक सजावट केली होती, तसेच सेक्सी ड्रेस घातला होता, असं त्याने म्हटलं होतं. दोघांनी पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवले, तेव्हाचे त्याने या पुस्तकात वर्णन केले होते. तसेच निहारिकाबरोबरचं नातं दीड वर्ष टिकल्याचा दावा त्याने केला होता. पण निहाराकाने मात्र अवघे काही महिनेच त्याच्याबरोबर नात्यात असल्याचं म्हटलं होतं. नवाजुद्दीनने अनेक गोष्टी वाढवून, रंगवून लिहिल्याचं ती म्हणाली होती. न्यूज १८ ने हे वृत्त दिलंय.
स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी अफेअर्स, नवाजुद्दीन सिद्दीकीची कबुली
सर्वात महत्त्वाचं म्हणजे नात्यात असताना नवाजुद्दीने तो विवाहित असल्याचं सांगितलं नव्हतं, आपल्याला पुस्तकातून समजलं, असं निहारिकाने म्हटलं होतं. एकूणच नवाजुद्दीनच्या वादग्रस्त आत्मचरित्राची प्रचंड चर्चा झाली होती. नात्यात असतानाच्या स्वतःच्या वर्तणुकीबद्दल नवाजुद्दीनने पुस्तकात अत्यंत मोकळेपणाने लिहिलं होतं. त्याने स्वतःला स्वार्थी व्यक्ती म्हटलं होतं. तसेच त्याच्याबरोबर नात्यात राहिलेल्या महिलांची नेहमी हीच तक्रार असायची की तो फक्त स्वतःच्या गरजांसाठी त्यांच्याकडे यायचा, असं त्याने पुस्तकात मांडलं होतं. तो निहारिकाच्या घरी फक्त शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जायचा आणि तिलाही तो स्वार्थी असल्याचं वाटत होतं, अशी कबुली नवाजुद्दीनने पुस्तकात दिली होती.
नवाजुद्दीनने स्वतःला म्हटलेलं वासनांध माणूस
या पुस्तकात नवाजुद्दीनने स्वतःला ‘वासनांध ग्रामीण माणूस’ असं म्हटलं होतं. त्याने स्वतःचं केलेलं वर्णन आणि त्याची अफेअर्स या गोष्टी मीडियात खूप गाजल्या. नवाजुद्दीनने निहारिकाबद्दल जे लिहिलं होतं, त्याचा तिने विरोध केला आणि आपल्या संमतीशिवाय या गोष्टी छापल्याचं स्पष्ट केलं होतं.
अफेअर्सबद्दल खुलासे अन् वाद
या पुस्तकात नवाजुद्दीनने त्याच्या आयुष्यातील अनेक अफेअर्स आणि ‘वन-नाईट स्टँड्स’बद्दल खुलासे केले होते. एकेकाळचा संघर्ष ते बॉलीवूड स्टार होण्यापर्यंतचा प्रवास म्हणून या पुस्तकाची जाहिरात केली गेली होती, पण त्याने केलेल्या अफेअर्सच्या उल्लेखामुळेच पुस्तक वादग्रस्त ठरलं होतं. हे पुस्तक लोकांना आवडणार नाही याची कल्पना होती, पण नाव न घेता सत्य लिहिण्यात अर्थ नव्हता, असा युक्तिवाद नवाजुद्दीनने सुरुवातीला केला होता. नावं घ्यायची की नाही याचा निर्णय घेण्यासाठी खूप वेळ घालवला, असंही त्याने म्हटलं होतं.
सुनिता राजवारनेही घेतलेला आक्षेप
फक्त निहारिकाच नाही, तर पुस्तकात उल्लेख असलेली त्याची एक्स गर्लफ्रेंड सुनिता रजवार हिनेही नवाजुद्दीनवर जाहीरपणे टीका केली. तो स्वार्थी असून त्याने खासगी गोष्टी सार्वजनिक केल्याचा आरोप केला होता. चौफेर टीका झाल्यानंतर नवाजुद्दीनने ज्यांच्या भावना दुखावल्या, त्यांची माफी मागितली होती. तसेच ‘अॅन ऑर्डिनरी लाईफ’ हे पुस्तक मागे घेतलं होतं. इतकंच नाही तर त्याने पुस्तकात या सर्व महिलांची नावे वापरल्याचा पश्चात्ताप असल्याचं म्हटलं होतं. भविष्यात कधी आत्मचरित्र लिहिलेच, तर खऱ्या गोष्टी अशा प्रकारे मांडणार नाही, कारण ‘सत्य नेहमीच सगळ्यांना पचणारं नसतं’, असंही तो म्हणाला होता.
