Neelam Kothari Govinda Relationship Secrets : बॉलीवूडचा एक काळ गाजवलेला अभिनेता गोविंदाचे अभिनेत्री नीलम कोठारीबरोबर नाव जोडले गेले होते. पडद्याच्या मागे दोघांच्या नात्याबाबत खूप चर्चा रंगल्या. सिनेमांमध्ये एकत्र काम करत असताना गोविंदाच्या मनात नीलमबद्दल भावना निर्माण झाल्या होत्या. यावर आता अनेक वर्षांनंतर नीलमने स्वतः प्रतिक्रिया देत गोविंदाबरोबरच्या नात्याबाबत खुलासा केला आहे. त्यावेळी तिचे वडील फारच कडक शिस्तीचे असल्याचे नीलमने सांगितले आहे.

गोविंदा व नीलम यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीबरोबर ऑफस्क्रीन रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. नीलमसाठी गोविंदा हा पत्नी सुनीता आहुजाबरोबर नाते संपवण्यास तयार झाल्याच्या चर्चा होत्या. यावर आता नीलमने ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाबरोबरच्या केमिस्ट्रीचा उल्लेख केला. ती म्हणाली, “त्यावेळी मी खूप लहान होते. गोविंदा विवाहित आहेत, हेदेखील मला माहीत नव्हते. नंतर मला त्याबद्दल समजले.”

गोविंदाबाबत काय म्हणाली नीलम?

८० ते ९० च्या दशकामध्ये गोविंदा व नीलम यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केले होते. त्या वेळी करिअर सुरू असताना रिलेशनशिपमध्ये येण्याचा विचारसुद्धा करत नव्हते, असे नीलम यांनी स्पष्ट केले. नीलम म्हणाली, “त्यावेळी माझे पूर्ण लक्ष हिंदी भाषा शिकण्यावर आणि चित्रपटांमध्ये काम करण्यावर केंद्रित होते. मी खूप लहान होते आणि माझे आई-वडील खूप कडक शिस्तीचे होते. त्यामुळे रिलेशनशिपचा विचार करणे हा माझ्याकडे पर्यायच नव्हता.”

Actress Neelam Kothari breaking silence on Govinda relationship rumors in Times Now interview.
नीलम कोठारी (फोटो – इन्स्टाग्राम)

नीलमचे वय कमी असल्यामुळे शूटिंगसाठी तिच्याबरोबर घरातील एखादी व्यक्ती सेटवर येत असल्याचे तिने सांगितले. नीलम म्हणाली, “मी खूप लहान असल्यामुळे माझ्याबरोबर नेहमीच कुटुंबातील एखादी व्यक्ती असायची. इंडस्ट्री वाईट आहे, असे म्हणून नाही पण मी लहान असल्याने घरचे माझ्याबरोबर येत होते.”

Actress Neelam Kothari breaking silence on Govinda relationship rumors in Times Now interview.
अभिनेत्री नीलम कोठारी (फोटो – इन्स्टाग्राम)

पुढे ती म्हणाली, “सेटवर सगळे जण माझे खूप लाड करायचे. माझे सह-कलाकार मला एखाद्या लहान मुलाप्रमाणे वागवायचे.” यावर तिचा पती समीर सोनी म्हणाला, “खास करून जॅकी श्रॉफ व संजय दत्त हे अभिनेते तर नीलमची खूप काळजी घ्यायचे आणि तिला जपायचे.”

Actress Neelam Kothari breaking silence on Govinda relationship rumors in Times Now interview.
गोविंदा व नीलम कोठारी यांचे नाते चर्चेत

दरम्यान, १९९० साली ‘स्टारडस्ट’ला दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदाने नीलमवरील प्रेम व्यक्त केले होते. तो म्हणाला, “आमची (गोविंदा व नीलम) खूप वेळा भेट व्हायची आणि जसजसं मी तिला ओळखत गेलो, तसतशी ती मला अजून जास्त आवडू लागली. ती इतकी प्रेमळ होती की, कोणताही पुरुष तिच्या प्रेमात पडेल. मी तिचं कौतुक करणे थांबवू शकत नव्हतो. माझ्या मित्रांमध्ये, कुटुंबीयांमध्ये, अगदी माझे जिच्याबरोबर लग्न ठरले होते, त्या सुनीतासमोरही मी नीलमचे कौतुक करायचो.”