Neena Gupta Interview On Bollywood Actors Ego Insecurity: बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता या अनेकदा त्यांची मते परखडपणे मांडताना दिसून येतात. त्यांनी अनेक दशके सिनेविश्वामध्ये काम केले असून, त्यांना सर्व सिनेमा, ओटीटी व मालिकांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. मात्र, तरीही आधीच्या कलाकारांपेक्षा तरुण कलाकारांबरोबर त्यांना काम करणे जास्त सहज वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन पिढीसमोर जास्त मोकळेपणाने वावरता येत असल्याचे नीना गुप्ता यांनी सांगितले.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नीना गुप्ता यांनी बॉलीवूडमधील कलाकारांबाबत वक्तव्य केले. त्यांच्या पिढीतील “जुन्या कलाकारांमध्ये अहंकार आणि असुरक्षिततेची भावना आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले. नीना गुप्ता यांनी अनेक वर्षे बॉलीवूडमध्ये काम केले असल्याने कोणत्या पिढीबरोबर काम करणे त्यांना जास्त थकवणारे वाटते, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नीना गुप्ता यांनी जुन्या पिढीबरोबर, असे उत्तर दिले.

जुन्या पिढीतील कलाकारांबाबत काय म्हणाल्या नीना गुप्ता?

नीना गुप्ता म्हणाल्या, “माझे नवीन पिढीबरोबर विचार चांगले पटतात आणि त्यांच्याबरोबर काम करायला मला आवडतं. त्यांच्यापेक्षा मी वयानं फार मोठी आहे, असं मला वाटतंच नाही. पण जेव्हा मी माझ्या वयाच्या कलाकारांबरोबर काम करते, तेव्हा मात्र खूप त्रास होतो.”

जुन्या कलाकारांमध्ये खूप अहंकार – नीना गुप्ता

नीना गुप्ता यांनी जुन्या पिढीतील कलाकारांमध्ये खूप असुरक्षितता (इनसिक्युरिटी) असल्याचे सांगितले. त्यांनी एका अभिनेत्याबरोबर आलेला अनुभव शेअर केला. त्या म्हणाल्या, “काही जुन्या कलाकारांमध्ये खूप अहंकार असतो. मी एकदा शूटिंग करत होते. त्यावेळी माझ्या मागे एक अभिनेता होता; पण तो मागे असल्यामुळे तो फ्रेममध्ये दिसत नाहीये, असे त्याला वाटत होते. त्यामुळे त्यानं मला मागे ओढले आणि स्वतः माझ्या जागी उभा राहिला. अशीच परिस्थिती आहे. त्यांच्यामध्ये खूप अहंकार आणि असुरक्षिततेची समस्या असते.”

नीना गुप्ता यांचा ‘चुंबक’ हा सिनेमा प्रदर्शित होणार असून, त्यामध्ये जवळपास सर्वच कलाकार हे तरुण आहेत. नीना गुप्ता यांच्यापेक्षा २० वर्षांनी लहान असलेल्या कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर करताना नीना म्हणाल्या, “जुन्या पिढीतील लोक बोललेल्या सर्व गोष्टी खूप मनाला लावून घेतात आणि त्यांना लगेच वाईट वाटते. पण, ‘चुंबक’मधील माझ्या सहकलाकारांबरोबर मी काहीही बोलू शकते आणि त्याचे त्यांना अजिबात वाईट वाटत नाही. त्यामुळे मला नेहमीच तरुण कलाकारांबरोबर काम करायला आवडतं.”

‘चुंबक’ सिनेमा कधी होणार रिलीज?

दरम्यान, आतिश कपाडिया यांनी दिग्दर्शित केलेला ‘चुंबक’ हा सिनेमा ११ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. त्यामध्ये नीना गुप्ता यांनी मुख्य भूमिका साकारली असून, त्यांच्यासह देवेन भोजानी, संदीपा धर, सुमीत व्यास, मानसी जोशी, अमायरा दस्तूर, सुमीत राघवन, हेली शाह, अर्जुन बिजलानी आणि डेलनाझ इराणी अशा अनेक कलाकारांनी स्क्रीन शेअर केली आहे.