अभिनेत्री नीना गुप्ता बॉलीवूडमधील अशा कलाकारांपैकी एक आहेत जे नेहमीच कुठल्याही गोष्टींबद्दल स्पष्टपणे बोलणं पसंत करतात. अशातच आता नीना यानी त्यांच्य वैयक्तिक आयुष्यातील एक प्रसंग सांगितला आहे. त्यांनी त्यांची लेक मसाबाला तिच्या वडिलांबद्दलचं सत्य कसं सांगितला आणि ती परिस्थिती कशी हाताळली याबद्दल भाष्य केलं आहे.

अभिनेत्री नीना गुप्ता यांनी नुकतंच त्यांची मुलगी मसाबा गुप्ता हिला तिचे वडील आणि माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांच्याबद्दलचं सत्य सांगितल्याचं म्हटलं. “परिस्थिती अशी होती की माझ्या बाळाचा जन्म झाला, तिला सत्य सांगणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. तिने जेव्हा जेव्हा मला विचारलं, तेव्हा मी हळूहळू आणि पद्धतशीरपणे तिला सत्य सांगितलं… मी मसाबाला अशा पद्धतीने सत्य सांगितलं की तिला तिच्या वडिलांचा तिरस्कारही वाटू नये. मी तिच्या मनात वडिलांबद्दल आपुलकी निर्माण केली. ती मोठी झाल्यावर काय आणि का घडलं, हे मी तिला सांगितलं,” असं त्यांनी ‘झूम’ला सांगितलं.

मी तिची माफी मागते -नीना गप्ता

“त्यामुळे तिच्या मनात कोणताही द्वेष नाही. मी तिला सत्य सांगितल्यामुळे माझ्याबद्दल तिच्या मनात रागही नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. बाहेरून कोणाकडून तरी सत्य समजण्यापेक्षा ते सत्य तुम्ही स्वतः सांगणं योग्य आहे. मला वाटतं, मी खूप समजूतदारपणे हे केलं. तिचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी तिच्याशी इतकी प्रामाणिक आहे की, अनेकदा मी तिची माफी मागते की तू लहान असताना तुझ्याबरोबर तुझे वडील नव्हते. मी तिची माफी मागते. ही माझी चूक आहे. पण ती समजून घेते. आपण सगळेच चुका करतो,” असंही त्यांनी सांगितलं.

नीना गुपता अनेकदा त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबर खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात. त्या स्पष्टपणे त्यांच्या आयुष्यातील घडामोडींबद्दल, त्यांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल बोलत असतात. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्या अनेकदा चर्चाचा विषयसुद्धा ठरतात.

दरम्यान, नीना गुप्ता यांनी आतापर्यंत अनेक चित्रपट, सीरिजमध्ये काम केलं आहे. अलीकडेच त्यांची ‘चुंबक’ ही सीरिज ओटीटीवर रिलीज झाली.