अभिनेत्री नीना गुप्ता यांनी महिलांना सहन कराव्या लागणाऱ्या भेदभावाबद्दल अनेकदा परखडपणे भाष्य केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी महिलांनी कोणते कपडे घातले आहेत, यावरून त्यांचं परीक्षण केलं जातं, असं म्हटलं. समाजातील ही मानसिकता कदाचित कधीच बदलणार नाही असंही त्यांना वाटतं. यावेळी त्यांनी काही दिवसांपूर्वी क्रिती सेनॉनवर झालेल्या टीकेबद्दलही भाष्य केलं आहे

नुकतंच आगामी वेब सीरिज ‘चुंबक’च्या प्रमोशनदरम्यान नीना यांनी त्यांच्या मैत्रिणीबरोबर घडलेला एक प्रसंग सांगितला. मैत्रीण कपड्यांचं माप देण्यासाठी टेलरकडे गेली असताना, तिने परिधान केलेल्या कपड्यांवर टेलरने आक्षेप घेतला होता.महिलांच्या कपड्यांकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनाबद्दल बोलताना नीना गुप्ता यांनी दिल्लीतील सीताराम बाजारसारख्या परिसराचं उदाहरण दिलं. अशा ठिकाणी आजही महिलांनी चेहरा पदराने झाकून ठेवावा, अशी अपेक्षा केली जाते, असं त्यांनी सांगितलं.

नीना गुप्ता नेमकं काय म्हणाल्या?

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत नीना म्हणाल्या, “मला वाटतं, हे असंच सुरू राहणार आहे. यात बदल होणार नाही. अजिबात नाही. माझे शब्द लक्षात ठेवा. कारण समाजाची रचनाच अशी आहे. आजही खरं तर काहीच बदललेलं नाही. जे काही बदललं आहे, तेही केवळ काही टक्क्यांनी. बदल एवढाच झाला आहे की महिलांनी कमावायला सुरुवात केली आहे.”

या समस्येवर उपाय काय असू शकतो, असं विचारल्यानंतर नीना म्हणाल्या, “आपण एकच गोष्ट करू शकतो. आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतो. त्यांना महिलांचा आदर करायला शिकवू शकतो. हाच एकमेव मार्ग आहे. कदाचित एक, दोन, तीन किंवा चार पिढ्यांनंतर परिस्थितीत काही बदल होईल. पण छोट्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये आपण याबद्दल चर्चा करू शकतो का? त्यांना कोण सांगणार? त्यांच्यासाठी मुलगा अधिक महत्त्वाचा असतो.”

नीना यांनी सांगितला मैत्रिणीबरोबरचा किस्सा

यानंतर नीना गुप्तांनी त्यांच्या मैत्रिणीबरोबर घडलेला प्रसंग सांगितला. त्या म्हणाल्या, “माझी एक मैत्रीण आहे आणि तिच्याबरोबर ही खरी घटना घडली आहे. ती टेलरकडे गेली होती. तिने त्याला स्पॅगेटी-स्ट्रॅपचा ब्लाऊज शिवायला सांगितला, ज्याची नेकलाइन जवळपास १०-११ इंच असावी, अशी तिची इच्छा होती. त्यावर टेलर तिला म्हणाला, मग ब्लाऊजच घालू नकोस.”

महिलांना आपल्या आवडीनुसार कपडे परिधान करण्याचं स्वातंत्र्य मिळावं, याबाबत नीना गुप्ता यांनी यापूर्वीही अनेकदा परखडपणे भाष्य केलं आहे. २०२२ मध्ये आपल्या कपड्यांवरून ट्रोल झाल्यानंतरही अभिनेत्रीने सोशल मीडियावरून ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं होतं.
नीना यांनी लिहिलं होतं, “मी हा फोटो पोस्ट करू इच्छिते, कारण काही लोकांना वाटतं की मी सध्या घातले आहेत तसे सेक्सी कपडे घालणाऱ्या महिला काहीच कामाच्या नसतात. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की, एखाद्याच्या कपड्यांवरून त्याचं मूल्यांकन करणं योग्य नाही. ट्रोलर्स, ही गोष्ट लक्षात ठेवा.”

क्रिती सेनॉनवर टीका का झालेली

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री क्रिती सेनॉन हिच्या एका रक्षाबंधनाच्या जाहिरातीतील पेहरावावरून वाद निर्माण झाला होता. या जाहिरातीवर टीका झाल्यानंतर ब्रँडने ती जाहिरात अखेर हटवली. याबाबत ब्रँडने स्पष्टीकरण देताना म्हटलं, “आमच्या जाहिरातीमुळे समाजातील काही घटकांच्या भावना दुखावल्या असतील, तर तसा आमचा हेतू मुळीच नव्हता.” क्रिती सेनॉन ही या ब्रँडमधील गुंतवणूकदारांपैकी एक आहे. जाहिरात हटवण्याच्या काही काळ आधी तिने महिलांच्या पेहरावावरून केल्या जाणाऱ्या टीकेवर प्रश्न उपस्थित केला होता. “महिलांनी काय घालावं हे सांगणं आपण कधी थांबवणार?” असा प्रश्न तिने केला होता.