ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी पैशांसाठी काही चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यांनी एका चित्रपटात फिरोज खानपेक्षा जवळजवळ २० वर्षांनी लहान असूनही त्यांच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली होती. तसेच कामाच्या ठिकाणी विचित्र व अपमानजनक कमेंट्सही केल्या गेल्या होत्या, अशी आठवण त्यांनी सांगितली.
शुभंकर मिश्राशी बोलताना नीना गुप्ता यांनी १९९२ च्या ‘यलगार’ चित्रपटातील भूमिकेबद्दल सांगितलं. “मी मोठ्या बहिणीची भूमिका केली होती. मी त्या सर्व भूमिका पैशांसाठी केल्या होत्या. कारण माझ्याकडे पैसे नव्हते, नाहीतर मी त्या भूमिका केल्या नसत्या,” असं नीना गुप्ता म्हणाल्या.
नीना गुप्ता यांनी चित्रपटसृष्टीतील वास्तवावरही भाष्य केलं. मोठ्या प्रमाणात वयस्कर अभिनेत्यांना तरुण अभिनेत्रींबरोबर चित्रपटांमध्ये घेतलं जातं पण मोठ्या अभिनेत्रींबरोबर तरुण अभिनेते अशी परिस्थिती क्वचितच दिसून येते. याला समाज कारणीभूत आहे, असं नीना गुप्ता यांना वाटतं. “आपला समाज ६० वर्षांच्या पुरूषाने २० वर्षांच्या महिलेशी लग्न केलं तर स्वीकारतो, परंतु त्याउलट असेल तर नातं स्वीकारलं जात नाही. चित्रपट समाजात काय घडतं, तेच दाखवतात, त्यामुळे चित्रपटसृष्टीत हा प्रकार पाहायला मिळतो,” असं मत नीना गुप्ता यांनी व्यक्त केलं.
नीना गुप्ता यांच्यामते, वयस्कर महिला व तरुण मुलगा अशा आशयाच्या कथा क्वचितच मोठ्या पडद्यावर येतात, कारण निर्मात्यांना हे चित्रपट चांगली कमाई करतील, असं वाटत नाही. “चित्रपट हा एक व्यवसाय आहे. त्यामुळे निर्मात्यांना वाटतं की असे चित्रपट चालणार नाहीत. किती महिला त्यांच्यापेक्षा लहान वयाच्या पुरुषांशी लग्न करतात? जर समाज ते स्वीकारत नसेल तर त्यावर चित्रपट कसे बनतील?” असं नीना गुप्ता म्हणाल्या.
नीना गुप्तांना पॅडेड ब्रा घालण्यास सांगितलं होतं…
नीना गुप्ता यांनी सुभाष घई यांच्या ‘खलनायक’ या चित्रपटातील ‘चोली के पीछे’ या गाण्याच्या शूटिंगचा अनुभवही सांगितला. या गाण्यात त्यांना पॅडेड ब्रा घालण्यास सांगण्यात आलं होतं. “गाण्यासाठी मला गुजराती पोशाख करायचा होता. नंतर तो पोशाख घालून मला दिग्दर्शक सुभाष घई यांना दाखवायला सांगितलं. ते पाहून सुभाष घई नाही… नाही.. म्हणाले. काही तरी भरा… ते ऐकून मला लाजीरवाणं वाटलं,” असं नीना गुप्ता यांनी सांगितलं. यानंतर नीना गुप्ता यांना दुसरी अंतरवस्त्रे देण्यात आली होती. पण सुभाष घई यांच्या या कमेंटचा खूप राग आला होता, असंही त्यांनी नमूद केलं.
“त्यावेळी मला खूप राग आला होता आणि त्यांनी असं विधान करणं चुकीचं होतं, पण आता मला वाटतंय की तो फक्त त्याचं काम करत होते. गाण्यातील पात्राबद्दल त्यांच्या मनात एक विशिष्ट प्रतिमा होती आणि ती तशी पडद्यावर यावी यासाठी त्यांनी ते म्हटलं होतं. पण तेव्हा मी नवीन होते. आता मी त्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने समजून घेते,” असं नीना गुप्ता म्हणाल्या.

