ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. महिलांना त्यांच्या घरात पितृसत्तेमुळे कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागतं, याबद्दल नीना गुप्ता अनेकदा बोलत असतात. आता परिस्थिती बदलू लागली असली तरी या अडचणी पूर्णपणे संपलेल्या नाहीत, असं नीना गुप्ता म्हणतात. आता त्यांनी स्वतःच्या कुटुंबातील उदाहरणं देऊन सांगितलं की आजही, सासरच्या लोकांच्या दबावामुळे लग्नानंतर महिलांना त्यांच्या साध्या इच्छा पूर्ण करण्याची परवानगी दिली जात नाही.
शुभंकर मिश्राशी बोलताना नीना गुप्ता म्हणाल्या, “त्यांना व्हर्जिन पत्नी हवी असते.” समाजात आजही कौमार्य ही एक मोठी गोष्ट आहे का? असं विचारल्यावर नीना गुप्ता म्हणाल्या, “आताही काय बदललंय? तुम्ही भारताबद्दल बोलत आहात का? कोण म्हणते की लोक मोकळ्या विचारांचे आहेत? आपल्या देशात बऱ्याच गोष्टी बदललेल्या नाहीत. स्त्रिया अजूनही डोक्यावर पदर घेऊन सासऱ्यांच्या पाया पडतात. तुम्ही आणि मी या समाजात अल्पसंख्याक आहोत. आपण म्हणजे खरा भारत नाही. आमच्यासारखे जे चांगले कपडे घालतात आणि चांगलं बोलतात तो खरा भारत नाही.”
नीना गुप्ता यांनी दिले कुटुंबातील उदाहरण
नीना गुप्ता यांच्या कुटुंबातील महिलांना त्यांच्या सासरी दररोज भेदभावाचा सामना करावा लागतो, असं उदाहरण त्यांनी दिलं. “मी तुम्हाला एक उदाहरण देते. माझ्या वडिलांच्या बाजूच्या एका मुलीचं लग्न मुंबईतील एका मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या मुलाशी झालं. एकदा माझ्या वडिलांनी त्या मुलाला, मुलीला आणि तिच्या कुटुंबाला त्यांच्या घरी बोलावलं आणि त्या जोडप्याशी बोलले. कारण मुलीने मुंबईत त्या मुलाबरोबर आणि त्याच्या कुटुंबाबरोबर राहण्यास नकार दिला होता. मुलगी साईबाबांची पूजा करायची, म्हणून तिने त्यांचा फोटो खोलीत लावला, पण तिच्या सासूबाईंनी तिला तो फोटो ठेवू दिला नाही आणि ते ज्या गुरूची पूजा करतात त्याचा फोटो लावण्यास सांगितले,” असं नीना गुप्ता यांनी सांगितलं.
त्या पुढे म्हणाल्या, “मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देते. माझ्या भाचीला तिच्या सासूने सांगितलं होतं की ती तिच्या बेडच्या बाजूच्या टेबलावर तिच्या कुटुंबाचा फोटो ठेवू शकत नाही. त्यामुळे देशातील महिलांची स्थिती बदलण्यासाठी आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.”
नीना गुप्ता ३० व्या वर्षी आई झाल्या होत्या. विवियन रिचर्ड्सबरोबरच्या नात्यातून त्यांची मुलगी मसाबाचा जन्म झाला. लग्न न करताच आई होण्याचा त्यांचा निर्णय त्या काळी खूप धाडसी होता. नीना गुप्ता यांनी लेक मसाबा मोठी झाल्यावर २००८ मध्ये चार्टर्ड अकाउंटंट विवेक मेहरा यांच्याशी लग्न केले आणि आता त्या आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात खूप सुखी आहेत.

