नीना गुप्ता बॉलीवूडमधील अशा कलाकारांपैकी एक आहेत ज्या नेहमी त्यांची मतं, प्रतिक्रिया स्पष्टपणे व्यक्त करताना दिसतात. त्या अनेकदा त्यांच्या व्यावसायिक व खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसतात. अशातच आता वैयक्तिक आयुष्याबद्दल त्यांनी भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी आयुष्यात अनुभवलेल्या प्रेमसंबंधांबद्दल सांगितलं आहे.
अभिनेत्री नीना गुप्ता यांनी नेहमीच आपल्या आयुष्याबद्दल, प्रेमसंबंधांबद्दल आणि काही निर्णयांमुळे झालेल्या पश्चात्तापाबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी अमलान कुसुम घोष यांच्याबरोबरच्या पहिल्या लग्नाबद्दल खुलासा केला. त्यांचं हे लग्न वर्षभरही टिकलं नव्हतं.
पहिल्या प्रेमाबद्दल नीना गुप्तांची प्रतिक्रिया
पहिल्या पतीबरोबरच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगताना नीना गुप्ता यांनी कॉलेजमधील एक किस्साही सांगितला. कॉलेजमधील काही वर्गमित्रांना त्यांचा हेवा वाटायचा असं सांगितलं. नीना म्हणाल्या, “आयआयटीमध्ये काम करणाऱ्या एका मुलावर मी पहिल्यांदा प्रेम केलं होतं. ज्याच्याशी पुढे मी लग्नही केलं. एकदा मी आणि माझ्या बॉयफ्रेंडने चित्रपट पाहायला जायचं ठरवलं होतं. चुकून मी माझ्या एका मैत्रिणीला याबद्दल सांगितलं. त्यानंतर तिने माझ्या आईला जाऊन सांगितलं की, मी एका मुलाबरोबर चित्रपट पाहायला जात आहे. त्यामुळे माझ्या आई-वडिलांनी मला चित्रपटाला जाऊ दिलं नाही. त्या काळात फोन नव्हते, त्यामुळे मी त्याला याबद्दल कळवूही शकले नाही. तो माझी वाट पाहत राहिला.”
माझ्यावर कधीच कोणी प्रेम केलं नाही – नीना गप्ता
मात्र प्रेमाबद्दल बोलताना नीना गुप्ता म्हणाल्या, “मी कधीच प्रेमात पडले नाही. चित्रपटांमध्ये पाहायला मिळतं आणि पुस्तकांमध्ये वाचायला मिळतं, तसं प्रेम मी खऱ्या आयुष्यात कधीच अनुभवलं नाही. माझ्यावर तसं कोणी प्रेम केलंच नाही. मग मीही कसं प्रेम करू शकणार? त्यासाठी समोरच्या व्यक्तीनेही तसं प्रेम करणं गरजेचं आहे ना? माझ्यासाठी कधीच कोणी वेडं झालं नाही.”
भावनीक जवळीक आणि नात्यांमधील संवादाबद्दल बोलताना नीना गुप्ता म्हणाल्या की, नात्यातील आपल्या भावना आणि कमकुवतपणा व्यक्त करण्यास अनेकांना अडचण येते. “मी अनेकदा मसाबाला सांगते की, तुझ्या वैयक्तिक भावना स्वतः पुरत्याच ठेव आणि त्याबद्दल कोणाशीही बोलू नकोस. मी तिला तिच्या भूतकाळाबद्दलही बोलू नकोस, असं सांगते. महत्त्वाचं म्हणजे वर्तमानात जगणं”. असं त्यांनी न्यूज १८शी संवाद साधताना सांगितलं आहे.
