Neena Gupta Vivian Richards Relationship : नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स यांचं नातं ८० च्या दशकात प्रचंड चर्चेत होतं. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आला असताना नीना आणि विवियन यांची भेट झाली. विवियन रिचर्ड्स तेव्हा विवाहित होते आणि त्यांना मुलेही होती. तरीही, नीना गुप्ता त्यांच्या प्रेमात पडल्या. दोघेही नात्यात राहिले. नीना गुप्ता गरोदर राहिल्या आणि त्यांनी मुलीला जन्म दिला. आता नीना गुप्ता यांनी एका मुलाखतीत याबद्दल भाष्य केलं आहे.
नीना गुप्तांनी सांगितलं की विवियन यांनी मूल होऊ देण्याच्या त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. पण नीना यांनी मसाबाच्या संगोपनासाठी कोणतीही आर्थिक मदत विवियनकडून घेतली नव्हती. आई होणं हा पूर्णपणे आपला निर्णय असल्याचं नीना यांनी स्पष्ट केलं.
“बाळ जन्माला घालण्याचा निर्णय माझा होता. मग मी विवियनला विचारलं की मी त्याच्या बाळाला जन्म देण्यास त्याची सहमती आहे का, आणि त्याने हो म्हटलं,” असं नीना गुप्तांनी शुभंकर मिश्राशी बोलताना सांगितलं. मसाबा ही आपली मुलगी आहे हे जाहीरपणे स्वीकारण्यास विवियनने कधीच संकोच केला नाही.
कधीच विवियनकडून पैसे घेतले नाहीत – नीना गुप्ता
बाळ दोघांचंही असलं तरी मसालाच्या संगोपनासाठी त्याच्याकडे कधीच पैसे मागितले नाहीत, असं नीना गुप्ता यांनी स्पष्ट केलं. “मला इतरांकडे पैसे मागणं आवडत नाही. मी खूप स्वाभिमानी आहे. मी कधी माझ्या आई-वडिलांकडेही पैसे मागितले नाहीत. त्यांनी जे दिले तेच मी घेतले,” असं नीना गुप्ता म्हणाल्या. आर्थिक स्वातंत्र्य फार महत्त्वाचे आहे, असं मत त्यांनी व्यक्त केले. नीना गुप्तांचे आई-वडील त्यांच्या अभिनयाच्या निर्णायवर नाराज होते. “त्यांना नेहमीच वाटायचं की अभिनय हा चांगला पेशा नाही. मी त्यांच्या इच्छेविरुद्ध मुंबईत आले होते, त्यामुळे मी त्यांच्याकडे पैसे कसे मागू शकते?” असं त्या म्हणाल्या.
नीना गुप्ता यांच्यामते एकट्याने बाळाचे संगोपन करणे आव्हानात्मक आहे, ते अजिबात सोपं नाही. विवियनबरोबर घालवलेला वेळ चांगला होता. पण एकट्याने बाळ वाढवण्यात भावनिक आणि व्यावहारिक अडचणीही येतात, असं नीना गुप्ता यांनी म्हटलं.

