Neena Gupta was replaced in Amitabh Bachchan’s film : अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. नेहमीच त्या ठामपणे त्यांचं मत मांडत असतात. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये काम मिळवण्यासाठी त्या आजही संघर्ष करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांना अनेक चित्रपटांतून काढून टाकलं गेलं याबद्दलही त्यांनी यामध्ये सांगितलं आहे. नीना गुप्ता लवकरच ‘पंचायत’च्या चौथ्या सीझनमध्ये झळकणार आहेत.
नीना गुप्ता यांनी नुकतीच नयनदीप रक्षितला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी त्यांच्या वयाच्या अभिनेत्रींना काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचं सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, “माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले अभिनेते आजही नायकाची भूमिका साकारत आहेत, पण मला मात्र आजीच्या भूमिकांसाठी विचारणा होते. पुरुषांना वेगवेगळ्या भूमिका करण्याची संधी मिळते, पण आम्हाला मिळत नाही. माझ्या अशा काही अभिनेत्री मैत्रिणी आहेत, ज्यांना काहीच काम मिळत नाहीये. मी आजही काम मिळवण्यासाठी लोकांना मेसेज करून विचारत असते. जेव्हा मी इन्स्टाग्रामवर एखाद्या चित्रपटाची घोषणा झालेली बघते, तेव्हा मी माझ्या मॅनेजरशी वार्ता करून त्या निर्मात्याशी संपर्क करते आणि मला चित्रपटात काही काम मिळू शकतं का असं विचारते. तुम्ही कितीही मोठे कलाकार असलात तरी तुम्हाला असं करावंच लागतं.”
नीना यांनी यादरम्यान त्यांच्याबरोबर घडलेला एक प्रसंग सांगितला आहे. यामध्ये त्यांना अचानक एका चित्रपटातून काढलं गेलं असून याची माहिती त्यांना पापाराझींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमधून समजल्याचं सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, “मला एका चित्रपटासाठी विचारणा झाली होती. मीसुद्धा त्या चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला होता. परंतु, काही दिवसांनंतर मी इन्स्टाग्रामवर माझ्या वयाच्या एका अभिनेत्रीला त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायला जाताना पाहिलं. माझ्या मॅनेजरला विचारलं, तेव्हा त्याने सांगितलं की माझ्याजागी चित्रपटासाठी तिची निवड करण्यात आली आहे.”
नीना पुढे म्हणाल्या, “नंतर मी चित्रपटाच्या निर्मात्याला जर तुम्ही तुमचा निर्णय बदलला होता तर मला निदान याबाबत सांगायला हवं होतं असा मेसेज केला. त्यावर त्यांनी सॉरी असं उत्तर दिलं आणि आता आम्ही एकत्र काम करत आहोत.” यासह नीना यांना अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातूनही अचानक काढण्यात आलेलं. त्या म्हणाल्या, “अमिताभ बच्चन यांच्या एका जुन्या चित्रपटातून मला अचानक काढण्यात आलेलं. त्यामधील भूमिकेसाठी मी सगळी तयारी केली होती, ब्लाऊज शिवलेले, कॉस्च्युम तयार होतं, पण अचानक त्या चित्रपटात माझ्या जागी तनुजा यांची निवड करण्यात आली आणि मला समजलं की मी त्या चित्रपटाचा भाग नाहीये. मला वाईट वाटलं, पण या गोष्टींमध्ये अडकण्यात काहीच अर्थ नाही; आपण पुढे जात राहायला हवं.”