बॉलीवूड गायिका नीती मोहन व तिच्या डान्सर बहिणी शक्ती व मुक्ती मोहन तुम्हाला माहितच असतील. त्यांचं मुंबईत पेंटहाऊस आहे. त्यांनी त्यांच्या घराची झलक दाखवली आहे. या घरात ४०० रोपं लावलेली आहेत. खरं तर या तिन्ही बहिणींपैकी कोणीही सध्या या घरात राहत नाही. फक्त त्यांचे आई-वडील आणि धाकटी बहीण राहतात.
चौघी बहिणीच असल्याने त्यांना नातेवाईक आई-वडिलांवरचं ओझं म्हणायचे. याच बहिणींनी ही मानसिकता बदलण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला. आई-वडिलांना कधीच मुलाची उणीव भासू नये, त्यांचं आयुष्य आनंदात जावं यासाठी त्यांनी त्यांना कोट्यवधी रुपयांचं आलिशान अपार्टमेंट भेट दिलं.
या बहिणींनी ‘Curly Tales’ ला कांदिवलीच्या ‘ठाकूर व्हिलेज’मधील २९ व्या मजल्यावर असलेल्या या पेंटहाऊसची सफर घडवून आणली. यावेळी त्यांनी राजस्थानी ‘गट्टे की सब्जी’, गुजराती ‘ढोकळा’ आणि ‘दही भल्ला’ यांसारख्या घरगुती पदार्थांचा आस्वाद घेतला.
दिल्लीसारखं घर मुंबईत
मोहन कुटुंब १० वर्षांपासून या घरात राहतंय. नीती व मुक्ती यांचं लग्न झालंय, तर शक्ती वेगळ्या ठिकाणी राहते. या घरातील अॅस्थेटिक व व्हायब्रंट वाईबबद्दल त्यांनी सांगितलं. “आम्ही दिल्लीचे आहोत, त्यामुळे तिथे घरातून सूर्योदय, सूर्यास्त दिसणं आणि टेरेस असणं खूप सामान्य आहे. आमच्या आई-वडिलांना दिल्लीतील या गोष्टींची मुंबईत खूप आठवण येत होती.”
४ मुली म्हणून घरात लावली ४०० रोपं
मोहन बहिणींनी त्यांच्या खोल्या, प्रशस्त लिव्हिंग रूम आणि टेरेस दाखवले. त्यांनी रंगीबेरंगी वस्तूंचा वापर करून खास दिल्ली स्टाइल घर सजवलंय. या घराची खासियत इथली झाडं आहे. घराचा जवळपास प्रत्येक कोपरा रोपट्यांनी बहरलेला आहे. “आमच्या आई-वडिलांना चार मुली आहेत, म्हणूनच त्यांनी या घरात ४०० रोपं लावली आहेत. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला एखादे रोप नक्कीच पाहायला मिळेल,” असं त्या म्हणाल्या.

हे घर कसं सापडलं? याची आठवण सांगत नीती म्हणाली, “एकदा आम्ही आमच्या शेजाऱ्यांच्या घरी रात्रीच्या जेवणासाठी गेलो होतो. आम्ही त्यांच्या टेरेसवर जेवायला बसलो होतो, तिथे आम्हाला जाणवलं की इथून ३६० डिग्री व्ह्यू दिसतो. आकाशातील चांदण्याही आम्हाला दिसत होत्या.”
लोक ओझं म्हणून हिणवायचे
शक्तीने सांगितलं की, हे घर विकत घेण्याची कल्पना तिच्या मोठ्या बहिणीला सुचली. “दीदीला मनापासून वाटायचं की आपण आपल्या आई-वडिलांना अत्यंत लाडात ठेवायला हवं. आमच्या पालकांना चार मुली आहेत म्हणून लोक अनेकदा त्यांना वाईट वाटेल, असं बोलायचे. आम्हाला त्यांच्यावरचं ‘ओझं’ म्हणून हिणवायचे. त्यामुळेच, आम्हाला त्यांच्यासाठी असं एक मोठं घर घ्यायचं होतं. आमचं काम प्रामुख्याने वांद्रे भागात आहे, पण असं तीन मजली घर तिकडे मिळणं शक्य नाही. ते इथे मिळालं, म्हणून घेतलं,” शक्ती मोहनने सांगितलं.
शक्ती अजूनही सिंगल आहे. तिची धाकटी बहीण मुक्तीचं लग्न झाल्यावर नातेवाईक लग्नासाठी तिच्यावर दबाव टाकतात. “मला एकटं स्वतंत्र वाटतं. मला एकटं राहायला आवडतं. माझ्या आयुष्यात आतापर्यंत आलेले सगळे पुरुष खूप त्रासदायक होते,” असं शक्ती हसत म्हणाली. “पण मुक्तीच्या लग्नात, प्रत्येकजण सहानुभूती दाखवत तुझंही लग्न होईल’ असं म्हणत होते.”
99acres वरील माहितीनुसार, ठाकूर व्हिलेजमध्ये मालमत्तेचे दर साधारणपणे ३ कोटी रुपयांपासून सुरू होतात. इथे ५ BHK अपार्टमेंटची किंमत अंदाजे १४.८ कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते.
