Neetu kapoor on alia bhatt : सिनेविश्वामध्ये पुन्हा एकदा कपूर कुटुंबाची जोरदार चर्चा सुरू आहे. याचे कारण म्हणजे रिद्धिमा कपूर आणि नीतू कपूर यांचा ‘दादी की शादी’ चित्रपट. कपूर आई-मुलीच्या या जोडीने प्रमोशनमध्ये काहीही कमी ठेवलेले नाही. रिद्धिमा कपूर वयाच्या ४५ व्या वर्षी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत असल्यामुळे प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
‘दादी की शादी’च्या प्रमोशनवेळी अनेक कौटुंबिक आणि वैयक्तिक विषयांवर नीतू कपूर यांनी मत मांडले. यावेळी मुलांचे संगोपन आणि पालकत्व यावर चर्चा करताना नीतू कपूर यांनी नात राहा कपूर आणि सून आलिया कपूर यांच्या नात्यावर भाष्य केले आहे. दोन्ही सासू-सुनेमध्ये राहाच्या संगोपनावरून काय मत आहे हे नीतू कपूर यांनी मांडले.
सोहा अली खान हिने नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर यांची मुलाखत घेतली आहे. मदर्स डे स्पेशल या मुलाखतीमध्ये कपूर कुटुंबातील अनेक गोष्टी दोघींनी स्पष्टपणे मांडल्या. यावेळी त्यांनी राहा, रणबीर, ऋषी कपूर यांच्यासह आलिया भट्ट हिचा देखील उल्लेख केला. तुम्ही एक अभिनेत्री म्हणून किंवा एक आई म्हणून तुमचे पूर्ण १०० टक्के प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही, असे मत नीतू कपूर यांनी व्यक्त केले.
राहा आलिया भट्टला घाबरते
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना भेटण्यावरूनदेखील नीतू कपूर यांनी मत मांडले. त्या म्हणाल्या की, राहा ही आलियाचे खूप ऐकते आणि ती एक उत्तम आई आहे; मात्र रणबीर तिच्यासाठी एका मित्रासारखा आहे. तो तिच्यासोबत भरपूर मज्जा-मस्ती करतो, पण राहा मात्र तिच्या आईला खूप घाबरते—कारण आलिया शिस्तीच्या बाबतीत अत्यंत कडक आहे, असे नीतू कपूर यांनी सांगितले.
आलिया आणि नीतू कपूरमध्ये गमतीशीर वाद
त्याचबरोबर आलियाच्या पालकत्त्वाच्या पद्धतीचेदेखील नीतू कपूर यांनी कौतुक केले. त्या म्हणाल्या, आलिया एक उत्कृष्ट आई आहे. ती बाळाची खूप छान काळजी घेते. ती तिला अगदी योग्य गोष्टी शिकवत आहे — टीव्ही नाही आणि इतर कोणत्याही अनावश्यक गोष्टी नाहीत, असे नीतू कपूर म्हणाल्या आहेत. त्याचबरोबर ‘राहा’ला जास्त लाडावून ठेवण्याच्या मुद्द्यावरून आलियाशी वारंवार होणाऱ्या मतभेदांबद्दल नीतू यांनी गमतीशीर किस्सा सांगितला. “मी तिच्याशी नेहमीच वाद घालत असते आणि म्हणते, ‘आलिया, निदान मला तिला एक चॉकलेट तरी देऊ दे.’ पण ती म्हणते, ‘नाही, तुम्हाला समजत नाही का की साखर तिच्या आरोग्यासाठी चांगली नाही?’ त्यावर मी तिला सांगते, ‘असू दे गं, मी तिची आजी आहे ना; मला तिला थोडे लाडावून ठेवू दे” असे गमतीशीर वाद आमच्यामध्ये होत असल्याचे नीतू कपूर यांनी सांगितले.
मला एक चांगली आजी बनायचे आहे – नीतू कपूर
पुढे नीतू कपूर यांनी सांगितले की, आजचे पालक खूप सजक आहेत आणि ते जे निर्णय घेतात त्याबद्दल मला आदर वाटतो. आता काळ बदलला आहे. माझ्या काळात मला जे सर्वोत्तम करता आले ते मी केले आणि आजच्या पालकांना त्यांना नक्की काय करायचे आहे, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. मला त्यांच्या कामात हस्तक्षेप करायचा नाही. मला फक्त एक चांगली आजी बनायचे आहे आणि राहा व समारा यांचे लाड करायचे आहेत,” असे देखील नीतू कपूर यांनी सांगितले.
