Neha Dhupia On Her Relationship With Angad Bedi : बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री नेहा धुपिया ही तिच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली. नेहाने २०१८ मध्ये अभिनेता अंगद बेदीबरोबर लग्न केलं. लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांनी त्यांनी एका मुलीला जन्म दिला. लग्नाआधीच नेहा गरोदर राहिली होती.
नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्या लग्नाबद्दल कळताच सर्वांनाच धक्का बसला होता. दरम्यान, नेहाने याआधी कधीही आपल्या नात्याबद्दल जाहीरपणे कबुली दिली नव्हती. मात्र, नुकत्याच एका मुलाखतीत नेहा व अंगदने त्यांच्या नात्याबद्दल आणि लग्नाबद्दल सांगितले आहे.
भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना अंगदने सांगितले की, तो तब्बल ८ वर्षे नेहाच्या होकाराची वाट पाहत होता. तो म्हणाला, “मी ८ वर्षांपासून नेहाचे प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतो. पण ती कधीच ‘हो’ म्हणाली नाही, तेव्हा ती तिच्या कामात खूप व्यग्र होती.”
“…तेव्हाच मी नेहाच्या प्रेमात पडलो” : अंगद बेदी
पुढे त्याने नेहाच्या पहिल्या भेटीची आठवणही सांगितली. याबद्दल अंगद म्हणाला, “जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिले, तेव्हा ती मला खूप सुंदर वाटली. ती जिममध्ये ट्रेडमिलवर पळत होती आणि मी तिला पाहत होतो. तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो होतो.”
अंगदने तिच्या जवळ जाण्यासाठी तिच्याबरोबर एका चित्रपटात कामही केले. अंगद म्हणाला, “सेटवर मी तिच्या आईबरोबर खूप वेळ घालवला. मला वाटले की, जर तिची आई इतकी चांगली आहे तर नेहासुद्धा नक्कीच चांगली असेल. तिच्या पालकांची मला पसंती होती, पण नेहा मला वर्षानुवर्षे फक्त मित्र मानत होती.”
“देवाचे आभार, मी गरोदर राहिले…” : नेहा धुपिया
अखेर नेहा-अंगदच्या आयुष्यात असं वळण आले की, त्यांना लग्नाचा निर्णय घ्यावा लागला. नेहाने मान्य केले की, तिच्या गरोदरपणामुळेच त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचले. नेहा म्हणाली, “देवाचे आभार की, मी गरोदर राहिले. कारण – त्या बाळामुळेच आमची ही प्रेमकथा पूर्ण झाली. आपण नेहमी लांबचे प्रेम शोधत असतो, पण आपल्याला जे प्रेम हवे असते ते अनेकदा आपल्या जवळच असते. आमच्या मुलीमुळेच आम्ही एकत्र आलो.”
दरम्यान, अंगद बेदी आणि नेहा धुपिया यांना आता दोन मुले आहेत. त्यांची पहिली मुलगी मेहरचा जन्म २०१८ मध्ये झाला, तर २०२१ मध्ये त्यांनी गुरिकला जन्म दिला. आज हे जोडपे आपल्या मुलांबरोबर आनंदी आयुष्य जगत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियाद्वारे ती मुलं आणि पतीबरोबरचे फोटो शेअर करत असते.
