९० च्या दशकात बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणारा अभिनेता गोविंदा त्याच्या जबरदस्त कॉमिक टायमिंग आणि सहज सुंदर डान्ससाठी ओळखला जायचा. एकेकाळी यशाच्या शिखरावर असलेला गोविंदा अलीकडच्या काळात वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवरील यशाऐवजी, आता त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील वाद आणि कुटुंबातील वाढत्या दुराव्याबद्दल अधिक बोललं जातंय. विशेषतः त्याची पत्नी सुनिता आहुजा त्याच्याबद्दल ज्या गोष्टी बोलतेय, त्यावरून बरेच तर्कवितर्क लावले जात आहेत.

याच चर्चांदरम्यान, गोविंदाचा भाचा विनय आनंदने मामाच्या आयुष्यातील काही गोष्टी सांगितल्या. ‘हिंदी रश’ पॉडकास्टमध्ये बोलताना विनय म्हणाला, “मला आयुष्यभर मामाकडून प्रेरणा मिळाली. केवळ मीच नाही, तर जेव्हा ते नंबर वन होते, तेव्हा संपूर्ण देश त्यांच्याकडून प्रेरणा म्हणून पाहायचा. तेव्हा असा एकही सुपरस्टार नव्हता जो त्यांची नक्कल करत नसेल किंवा त्यांच्यासारखा डान्स करत नसेल. ज्यांना डान्स येत नव्हता, त्यांनीही त्यांच्यामुळे नाचायला सुरुवात केली. मी त्यांना घरीही जवळून पाहिलं आहे. जेव्हा माझ्या आजीचा वाढदिवस असायचा आणि ते घरी यायचे, ते एका ताटात तिचे पाय धुवायचे आणि नंतर तेच पाणी तीर्थ म्हणून प्यायचे.”

गोविंदाने ऑफर्स स्वीकारल्या नाहीत- विनय आनंद

गोविंदाशी जवळचं नातं असूनही त्या स्वीकारल्या नसल्याची कबुली विनयने दिली. “मी बरेचदा निराश होतो. मी त्यांच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स घेऊन गेलो, पण त्यांनी त्या केल्या नाहीत. मी अनेक कार्यक्रमांच्या ऑफर्स नेल्या, पण त्यांनी त्या स्वीकारल्या नाहीत. त्यामागे त्यांची स्वतःची काही कारणं असतील. आमच्यात १४ वर्षांचे अंतर आहे आणि ते माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत. ते माझे मामा असले तरी आदरपोटी मी त्यांना कधीही ‘का?’ असा प्रश्न विचारला नाही.”

७० चित्रपटांचा हिरो असूनही गोविंदासमोर आजही झुकतो विनय आनंद

विनय आनंद लोकप्रिय भोजपुरी अभिनेता आहे. “मामा जे काही बोलतात, त्यावर मी फक्त ‘जी सर’ म्हणतो. आजही मी ७० चित्रपटांचा हिरो आहे, एका ठराविक भागात सुपरस्टार आहे. माझ्याकडे प्रसिद्धी, आदर सगळं आहे, पण आजही त्यांच्यासमोर मी आदराने वागतो. मी आजही तसाच आहे जसा लहानपणी होतो,” असं विनय आनंदने सांगितलं.

गोविंदाच्या अफेयरबद्दल विनय म्हणाला…

विनयने यापूर्वी गोविंदाच्या मराठी अभिनेत्रीशी कथित अफेयरच्या अफवांचा आणि सुनीता आहुजाच्या वक्तव्यांबद्दल प्रतिक्रिया दिली. “मला गोविंदाला याबद्दल विचारायचं होतं, पण मी त्यांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करतोय, असं त्यांना वाटवं हे मला नको होतं. ते माझे मामा आहे, माझ्या वडिलांसारखे आहेत,” असं विनय आनंदने नमूद केलं.

“मामा, तुमचं खरंच अफेअर आहे का?” विनयने विचारला थेट प्रश्न

गोविंदाच्या अफेयरच्या चर्चा फार वाढल्यावर एकदा विचारल्याचं विनयने सांगितलं. “पण मी त्यांना एकदा विचारलं होतं की, तुमचं अफेयर आहे का? तो मला म्हणाला, ‘नाही, असं काही नाहीये.’ त्यांनी नकार दिला, त्यावर माझा विश्वास आहे. पण जेव्हा मी माझ्या मामीच्या मुलाखती पाहतो, तेव्हा थोडं विचित्र वाटतं, कारण आम्ही त्यांना नेहमीच गोविंदाचा आदर करताना पाहिलंय,” असं विनय आनंद म्हणाला.