Parineeti Chopra Lalbaugcha Raja VIP Darshan Video Call Raghav Chadha: गणेशोत्सवानिमित्त बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले, मात्र यावेळी तिने पती आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना थेट बाप्पाच्या चरणांजवळ उभे राहून व्हिडीओ कॉलवर दर्शन घडवले. सामान्य भाविक तासनतास रांगेत उभे असताना आणि त्यांना अवघ्या काही सेकंदांत ढकलले जात असताना, परिणीतीला मिळालेल्या आरामात फोटो काढण्याच्या व व्हिडीओ कॉल करण्याच्या सुविधेमुळे सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
खरं तर गणेशोत्सवात मुंबईतील लालबागच्या राजाचं दर्शन घेणं हा प्रत्येक भक्तासाठी अत्यंत भावुक आणि अविस्मरणीय अनुभव असतो. गणेशोत्सवाच्या दिवसांत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक मुंबईत दाखल होतात. अनेक सेलिब्रिटीही दरवर्षी बाप्पाच्या दर्शनाला जातात. यंदा शाहरुख खानने पत्नी गौरी व मुलगी सुहानाबरोबर बाप्पाचे दर्शन घेतले. तर रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, सनी लिओनी, रिंकू राजगुरू, रोहित शर्मा, परिणीती चोप्रासह अनेकजण लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झाले.
मात्र, लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान असणारी गर्दी आणि ‘व्हीआयपी संस्कृती’ हा नेहमीच चर्चेचा आणि काहीसा वादाचा विषय ठरतो. सामान्य जनता तासनतास ताटकळत उभी असताना, व्हीआयपी व्यक्ती, राजकीय नेते आणि सेलिब्रिटींना अगदी काही मिनिटांत थेट राजाच्या चरणांजवळ दर्शन दिले जाते. यामुळे सामान्य भाविकांना अनेकदा धक्काबुक्की सहन करावी लागते आणि त्यांना राजाचे रूप डोळे भरून पाहण्यासाठी अवघे काही सेकंदच मिळतात. व्हीआयपी आणि सामान्य भक्तांमधील हा भेदभाव आणि सुरक्षारक्षकांचे अवाजवी वर्तन यावर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर टीका होते. यावेळी परिणीती चोप्राने बाप्पाचे दर्शन घेतले तेव्हा असाच काहिसा प्रकार पाहायला मिळाला.
पाहा परिणीती चोप्राचे व्हिडीओ
एकीकडे सामान्य लोक बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दीत, रांगेत उभे होते. त्यांना काही सेकंद दर्शन घेतल्यानंतर तिथून बाहेर काढलं जात होतं. तर दुसरीकडे परिणीती चोप्रा बराच वेळ गणरायासमोर उभी होती. इतकंच नाही तर तिने पती व राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना तिथूनच व्हिडीओ कॉल केला आणि बाप्पाचे दर्शन घडवले. त्यानंतर तिथे तिने फोटोही काढले. परिणीती चोप्राचे हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

‘हा फक्त सेलिब्रिटींचा गणपती आहे, सामान्य लोकांचा नाही,’ ‘एकीकडे हे आरामात दर्शन घेतात दुसरीकडे सामान्य भाविकांना धक्काबुक्की केली जाते’, ‘सेलिब्रिटीचा राजा’, ‘व्हीआयपी लोकांना स्पेशल दर्शन आणि सामान्य लोकांना लांब रांगेत उभं राहण्याची शिक्षा’, ‘कुणीतरी सामान्य भाविकांना धक्के देतात त्याप्रमाणे हिलाही धक्का द्या,’ ‘काय हास्यास्पद प्रकार सुरूये, लाखो लोक रांगेत उभे आहेत आणि ही आरामात व्हिडीओ कॉल करून दर्शन घेतेय’, ‘सामान्य लोकांना अशा रितीने दर्शन कधीच घेऊ दिलं नसतं’, ‘बाकिच्यांना जोरात ढकलत आहेत आणि हिला व्हीआयपी असल्याने कशी सुविधा आहे बघा’, अशा प्रकारच्या कमेंट्स या व्हिडीओवर आहेत.
