Nikkhil Advani on Kal Ho Naa Ho remake: ‘कल हो ना हो’ हा सिनेमा २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता. निखिल अडवाणींनी सिनेमाचे दिग्दर्शन केले होते, तर करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने सिनेमाची निर्मिती केली होती. हा सिनेमा प्रचंड गाजला होता. शाहरुख खान, प्रीती झिंटा, सैफ अली खान या सिनेमात प्रमुख भूमिकांत दिसले होते.

शाहरुख खानने सिनेमात अमन ही भूमिका साकारली होती, तर सैफ अली खान रोहितच्या भूमिकेत दिसला होता. प्रीती झिंटाने नैना या भूमिकेतून सर्वांची मने जिंकली होती. नैना आजारी अमनच्या प्रेमात पडते, तर रोहितच्या मनातही नैनाबद्दल भावना असल्याचे पाहायला मिळते. हा रोमँटिक सिनेमा त्या वर्षांतील बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या सिनेमांपैकी एक ठरला. आजही या सिनेमाची लोकप्रियता कमी झालेली नाही.

निखिल अडवाणी काय म्हणाले?

आता सिनेमाचे दिग्दर्शक निखिल अडवाणी यांनी या सिनेमाबद्दल एका मुलाखतीत वक्तव्य केले आहे. त्यांचे हे वक्तव्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. बदलत्या सामाजिक दृष्टिकोनानुसार सिनेमाची गोष्टही बदलली असती असे ते म्हणाले आहेत. निखिल अडवाणी यांनी नुकतीच मिड डे मिलला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले की, जर ‘कल हो ना हो’ आज बनवला गेला असता, तर चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांना स्वीकारणे कठीण गेले असते. याबरोबरच जर सिनेमाच रीमेक आज बनवला गेला तर रीमेकमध्ये अमन व रोहित यांच्यातील नात्याचा विचार केला जाऊ शकतो.

ते म्हणाले की, २००३ मध्ये चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांनी ज्या दृष्टिकोनातून तो सिनेमा पाहिला, त्यापेक्षा आजची तरुण पिढी त्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहते. माझ्या स्वतःच्या मुलीला कांता बेन या पात्राने अमन आणि रोहित यांच्या नात्याबद्दल, समलैंगिकतेशी संबंधित गैरसमजांवर केलेले विनोद अस्वस्थ करणारे वाटले.

अमन व रोहित यांच्यात चांगली मैत्री पाहायला मिळाली होती. याबद्दल निखिल अडवाणी म्हणाले, “माझ्यासाठी चित्रपट तेव्हाच संपला जेव्हा अमन आणि रोहित यांनी एकमेकांशी नैनाच्या भविष्याबद्दल करार केला. त्या करारात एका मुलीचा समावेश होता आणि ती मुलगी बाहेर कॉरिडॉरमध्ये उभी होती. आज अनेक मुली विचारतात की, ते दोघे इतके महत्त्वाचे बोलत असताना ती बाहेर का उभी होती?”

ते म्हणाले की, बदलत्या सामाजिक दृष्टिकोनामुळे प्रेक्षक चित्रपटातील नात्यांकडे आता वेगळ्या दृष्टीने पाहतात. त्या काळात ज्या पद्धतीने ‘कल हो ना हो’चा शेवट केला होता, तसा आज जर सिनेमा बनवला तर तसा शेवट करणार नाही.

‘कल हो ना हो’च्या रिमेकवर निखिल अडवाणी काय म्हणाले?

‘कल हो ना हो’च्या रिमेकबद्दल निखिल अडवाणी म्हणाले, “जर आता ‘कल हो ना हो’चा रीमेक बनवला गेला, तर अमन आणि रोहित यांच्यातील रोमान्सचा विचार केला जाऊ शकतो.”

दरम्यान, अलीकडे अनेक सिनेमांचा रिमेक पाहायला मिळत आहे, त्यामुळे ‘कल हो ना हो’ सिनेमाचा रिमेकही प्रेक्षकांच्या भेटीला येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.