‘मिस्टर आझाद’, ‘अकेले हम अकेले तुम’ आणि ‘परदेसी बाबू’ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री निकी वालिया हिने ९०च्या दशकाच्या सुरुवातीला बॉलीवूडपासून काही काळ दूर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर मालिका विश्वात प्रवेश केल्यानंतर तिला मोठं यश आणि लोकप्रियता मिळाली.

तिने बॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेतल्याने त्यावेळी अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता आणि तिच्या या निर्णयामुळे अनेक चर्चांनाही उधाण आलं होतं. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत निक्कीने बॉलीवूडपासून दूर जाण्यामागचं खरं कारण सांगितलं. चित्रपटसृष्टीतील वातावरणामुळे आपण हा निर्णय घेतल्याचा खुलासा तिने केला.

महिलांना वस्तूसारखं वागवलं जायचं – निकी वालिया

झूमला दिलेल्या मुलाखतीत निकी वालियाने चित्रपटांमधून टीव्हीकडे वळण्याबाबत मोकळेपणाने भाष्य केलं. ती म्हणाली, “इंडस्ट्रीत त्यावेळी महिलांकडून ज्या मूर्खपणाच्या गोष्टींची मागणी केली जायची, आणि लोक ज्या पद्धतीने बोलायचे, त्यांचा बोलण्याची पद्धत देखील खूप उद्धट होता”. अभिनेत्रीने पुढे सांगितलं, “अरे तू काय, अरे हे काय… अशा पद्धतीने बोलणं माझ्यासाठी खूप धक्कादायक होतं. महिलांना वस्तूसारखं वागवलं जायचं. अरे ती येणार आहे, तिला बोलवा… अशा प्रकारे चर्चा व्हायची. मी हे सगळं ऐकत होते आणि अशा लोकांच्या आसपासच बसायचे. चित्रपटसृष्टीतील लोकांची वृत्ती आणि माझी वृत्ती वेगळी होती. यात कुणी चुकीचं किंवा बरोबर नव्हतं. ना मी बरोबर होते, ना ते चुकीचे होते.”

टेलिव्हिजनकडे वळल्यानंतर निकी वालियाने ‘अस्तित्व… एक प्रेम कहानी’, ‘दिल संभल जा ज़रा’, ‘घर एक सपना’ यांसह अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं. अभिनेत्रीने आठवण सांगितली की, तिने चित्रपटांमधून ब्रेक घेतल्यानंतर तिच्या या निर्णयामागचं कारण जाणून घेण्यासाठी माध्यमांनी तिच्याशी संपर्क साधला होता. यादरम्यान ‘मिस्टर आझाद’च्या सेटवर तिचे मतभेद झाल्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं.

निकी वालियाने बॉलिवूड सोडण्याचा घेतलेला निर्णय

बॉलीवूड सोडण्यामागे वैयक्तिक कारणं असल्याचा खुलासा करत निकी वालिया म्हणाली, “त्यावेळी मला इंडस्ट्रीकडून खूप विरोध झाला. एका टप्प्यावर मला वाटलं, तू तर इंडस्ट्रीतून बाहेर पडलीस पण आता तुला काम हवं असलं तरी या लेखानंतर तुला कोणी काम देणार नाही. कारण सगळे घाबरले होते की, हिने जर इंडस्ट्रीतील आतल्या गोष्टी उघड केल्या तर? नुकत्याच आलेल्या या मुलीने इतका धाडसी लेख दिला आहे. म्हणजे ही कोणालाही घाबरत नाही. आणि मी का घाबरू? पहिली गोष्ट म्हणजे मी खोटं बोलत नव्हते. मी कोणाचंही नाव चुकीच्या पद्धतीने घेत नव्हते.”