This Male Actor Won The Best Actress Award : गेल्या काही वर्षांत अनेक भारतीय अभिनेत्यांनी चित्रपटांमध्ये महिला किंवा ट्रान्सजेंडर व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. कमल हासन यांनी ‘चाची ४२०’ मध्ये तर अक्षय कुमारने ‘लक्ष्मी’मध्ये अशा भूमिका साकारल्या होत्या. या भूमिकांमुळे त्यांनी अनेकांचं लक्ष वेधलं. मात्र, एका भारतीय अभिनेत्याने खास कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर चक्क सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकण्याचा अनोखा विक्रम केला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणाऱ्या अभिनेत्याचं नाव आहे निर्मल पांडे. १९९६ मध्ये निर्मल पांडे यांनी ‘दायरा’ Daayraa या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी केलं होतं. त्या काळात भारतीय सिनेमात फार कमी बोलल्या जाणाऱ्या लिंग ओळख, महिलांवरील हिंसा, मानसिक आघात आणि समाजातील भेदभाव अशा विषयांवर हा चित्रपट आधारित होता.
चित्रपटात निर्मल पांडे यांनी ट्रान्सजेंडर कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यांचं एका लैंगिक अत्याचारातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेबरोबर भावनिक नातं तयार होतं. ही भूमिका लोकप्रिय मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने साकारली होती. दोघांच्या संवेदनशील आणि प्रभावी अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
लिमका बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये झालेली नोंद
१९९७ मध्ये (Valenciennes International Festival of Action and Adventure Films) या फ्रान्समधील चित्रपट महोत्सवात निर्मल पांडे आणि सोनाली कुलकर्णी यांना ‘दायरा’मधील अभिनयासाठी संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. यामुळे निर्मल पांडे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणारे एकमेव भारतीय पुरुष अभिनेते ठरले. त्यांच्या या अनोख्या विक्रमाची नोंद नंतर लिमका बुक ऑफ रेकॉर्डस (Limca Book of Records) मध्येही करण्यात आली.
भारतात चित्रपटावर घेतला गेला होता आक्षेप
परदेशात भरभरून कौतुक मिळूनही ‘दायरा’या चित्रपटाला भारतात थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. १९९० च्या दशकात लैंगिकता, लिंग ओळख आणि हिंसा यांसारखे विषय इतक्या धाडसी पद्धतीने दाखवणे त्या काळात खूप वेगळं मानलं जात होतं. नंतर अमोल पालेकर यांनी दिलेल्या मुलाखतींनुसार, सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही संवाद आणि दृश्यांवर आक्षेप घेतला होता. काही बदल केल्यानंतर चित्रपटाला ‘अडल्ट’ प्रमाणपत्र मिळालं, पण तरीही त्याला भारतात योग्य थिएटर रिलीज मिळू शकलं नाही.
मात्र, कालांतराने हा चित्रपट सिनेरसिकांमध्ये लोकप्रिय ठरला. लिंगभेदासारखे विषय संवेदनशीलतेने आणि सखोलपणे मांडणाऱ्या सुरुवातीच्या भारतीय चित्रपटांपैकी एक म्हणून आजही त्याची आठवण काढली जाते.
१९६२मध्ये राजस्थानमध्ये जन्मलेल्या निर्मल पांडे यांनी प्रतिष्ठित नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा(NSD) मधून अभिनयाचं शिक्षण घेतलं होतं. तिथेच त्यांनी रंगभूमी आणि अभिनयाची मजबूत पायाभरणी केली. त्यानंतर त्यांनी काही काळ लंडनमध्ये थिएटरमध्ये काम केलं आणि नंतर भारतात परतले. निर्मल पांडे यांनी दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या Bandit Queen या चित्रपटातून सिनेमात पदार्पण केलं. या चित्रपटात त्यांनी विक्रम मल्लाह ही भूमिका साकारली होती.
निर्मल पांडे आपल्या प्रभावी स्क्रीन प्रेझेन्स आणि वेगवेगळ्या भूमिका साकारण्याच्या कौशल्यामुळे लवकरच चर्चेत आले. ‘औझर’Auzaar, ‘प्यार किया तो डरना क्या’ Pyaar Kiya To Darna Kya आणि One 2 Ka 4 यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार खलनायकाच्या भूमिका साकारल्या. मात्र, फक्त नकारात्मक भूमिकाच नाही तर त्यांनी उत्कृष्ट विनोदी अभिनय आणि वेगवेगळ्या छटांच्या भूमिकांमधूनही आपली खास ओळख निर्माण केली.
निर्मल पांडे यांचं २०१० मध्ये वयाच्या ४७व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं, अशी माहिती समोर आली होती. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला होता. शांत पण प्रभावी अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या निर्मल पांडे यांच्या कामाचं अनेकांनी कौतुक केलं होतं. त्यांचा अखेरचा ‘लाहोर’ हा चित्रपट त्यांच्या निधनानंतर प्रदर्शित झाला आणि त्यालाही समीक्षकांकडून चांगली प्रतिक्रिया मिळाली.
