करोना महामारीमुळे अनेक उद्योगांना मोठा फटका बसला. सिनेसृष्टीतही चित्रपट व मालिकांचे शूटिंग थांबल्याने कलाकारांपुढे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहिला होता. याच काळात अभिनेत्री व उद्योजिका पारुल गुलाटी हिने ‘निश हेअर’ (Nish Hair) या हेअर एक्सटेंशन्स ब्रँडवर लक्ष केंद्रित करून व्यवसाय वाढवला. २०१७ मध्ये लाँच झालेल्या या ब्रँडला याच काळात खऱ्या अर्थाने गती मिळाली. २०२० मध्ये तिने स्वतःचं पहिलं घरही खरेदी केलं. आता पारुलने तिच्या गोव्यातील ‘मालकीण हाऊस’ (Malkin House) या घराची सफर चाहत्यांना घडवून आणली.

२०२० च्या त्या कठीण काळात तिने पहिल्यांदा १ कोटी रुपये कमावले. ती म्हणाली, “लोक ‘निश हेअर’वरून खरेदी करत होते, पण दुसरीकडे एक अभिनेत्री म्हणून मी स्वतःची ओळख तयार करण्यासाठी धडपडत होते. माझ्या पाच प्रोजेक्ट्सपैकी एकही चालला नाही. अशा परिस्थिती मी माझे पहिले १ कोटी रुपये कमावले होते.” व्यवसायातून कमावलेल्या पैशांमधून पारुलने गोव्यात घर घेतलं.

मला गोव्यात राहायला आवडत नाही- पारुल गुलाटी

नवीन घराबद्दल बोलताना पारुल म्हणाली, “मला गोवा हे शहर म्हणून फारसं आवडत नाही. मला तिथं कायमचं राहायला आवडत नाही, फक्त फिरायला जायला आवडतं. त्यामुळे मी विचार केला की, इथे एक घर घ्यायला पाहिजे, जेणेकरून ते भाड्याने देता येईल आणि जेव्हा कधी माझी इच्छा असेल तेव्हा मी तिथे जाऊन राहू शकेन.” स्विमिंग पूल असलेल्या या घराची किंमत २.७ कोटी रुपये आहे, असं पारुलने सांगितलं. या घरासाठी तिला ४० लाख कर भरावा लागला. तिने सगळे पैसे १० हप्त्यांमध्ये भरले, प्रत्येक हप्ता २७ लाख रुपयांचा होता.

२०२२ ऐवजी २०२५ मध्ये मिळाला घराचा ताबा

पारुलला हे घर डिसेंबर २०२२ मध्ये मिळणार होतं, पण लॉकडाऊनमुळे त्याला एक वर्ष उशीर झाला. त्यानंतर २०२३ उजाडलं, पण इतर काही कारणांमुळे घराला आणखी उशीर झाला. अखेर तिला २०२५ मध्ये हे घर मिळालं. पण हे घर ती भाड्याने देणार आहे.

Actress Parul Gulati inside her luxury Goa house Malkin House

एका रात्रीचं भाडं ४० हजार रुपये

पारुलने सांगितलं की हे घर तिला ‘एअरबीएनबी’वर (Airbnb) लिस्ट करायचं आहे. या घराचं भाडं प्रति रात्र ४०,००० रुपये कमावण्याचा तिचा प्लॅन होता. पण आता तिला समजलंय की मार्केट अशा प्रकारे चालत नाही. मार्केटमध्ये जो दर सुरू असेल, त्यानुसारच ती भाडं आकारू शकते.

“त्यावेळी मला याचं गणित माहित नव्हतं. पीक सीझनमध्ये तुम्ही जे भाडे आकारता, तेच तुम्हाला इतर ऋतूंमध्ये मिळणार नाही, हे तेव्हा मला समजत नव्हतं. मी लहान होते. सध्या मी दिवसाला किती भाडे आकारायचं हे ठरवलं नाही, पण मी ते मार्केट दरानुसारच ठेवेन,” असं पारुल म्हणाली.

मिनिमलिस्ट डिझाईन, कस्टमाईज्ड वॉशरुम्स आणि ‘ब्लॅक अँड ब्राऊन’ रूम्स

पारुलने हे घर जगभरातील तिच्या विविध प्रवासादरम्यान गोळा केलेल्या वस्तू आणि आठवणींनी सजवलं आहे, तर उर्वरित वस्तू इतर ठिकाणांहून खरेदी केल्या आहेत. लोकांनी नकळत भिंतींवर हाताचे ठसे उमटवून त्या खराब करण्याची भीती पारुलला वाटते, पण तरी घर मात्र पांढऱ्या रंगाचंच ठेवलंय. घरात भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि हवा येईल अशा पद्धतीने ते डिझाईन करण्यात आलंय.