Nitish Bharadwaj on Ramayana Part 1 Trailer : नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायण पार्ट १’ सिनेमाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर रिलीज झाला आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या सिनेमामध्ये रणबीर कपूर प्रभू रामांच्या, तर साई पल्लवी ही माता सीतेची भूमिकेमध्ये झळकत आहे. तर दाक्षिणात्य सुपरस्टार यश हा रावणाची भूमिका साकारत आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भव्य व्हीएफएक्स, दमदार संवाद आणि पौराणिक कथेला नव्या पद्धतीने पडद्यावर साकारल्यामुळे या ट्रेलरची सर्वत्र चर्चा रंगली आहे. प्रेक्षकांसह सिनेविश्वातील अनेक कलाकारांकडून चित्रपटाला शुभेच्छा दिल्या जात आहेत. आता बी. आर. चोप्रा यांच्या २००१ मधील ‘रामायण’ मालिकेमध्ये रामाची भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज यांनी या ट्रेलरचे भरभरून कौतुक केले. तसेच रणबीर कपूरच्या अभिनयाचे कौतुक करताना त्यांनी रणवीर सिंहचा उल्लेख केला आहे.
‘रामायण पार्ट १’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर सर्वत्र या सिनेमाची चर्चा सुरू झाली आहे. ट्रेलरमध्ये अनेक कलाकारांच्या मुख्य भूमिका दिसून आल्या असून, प्रेक्षकांमध्ये सिनेमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. संपूर्ण ट्रेलरमध्ये व्हीएफएक्सचा दमदार वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर ट्रेलरमध्ये दमदार संवादही ऐकायला मिळत आहेत. रावणाचे राक्षसराज, सृष्टीचा उद्धार करण्यासाठी प्रभू रामांचा जन्म, कैकयीचं पुत्रप्रेम, राजा दशरथ यांनी दिलेलं वचन, राम-लक्ष्मण व सीतेचा वनवास अशा रामायाणातील अनेक घटनांची झलक ट्रेलरमध्ये दिसून आली आहे. कलाकारांच्या अभिनयाचे आणि सिनेमाच्या भव्यतेचे सर्वांनी कौतुक केले आहे. नितीश भारद्वाज यांनीही रणबीरच्या अभिनयाचे कौतुक करीत त्याला यापुढील प्रवासासाठी एक खास सल्ला दिला आहे.
हा १०० टक्के ऑस्कर पुरस्कार जिंकू शकतो – नितीश
सोशल मीडियावर रामायणचे पोस्टर शेअर करीत नितीश भारद्वाज यांनी ‘रामायण पार्ट १’ सिनेमावर त्यांचं मत व्यक्त केलं आहे. नितीश यांनी लिहिलं, ” ‘रामायण पार्ट १’ हा १०० टक्के ऑस्कर पुरस्कार जिंकू शकतो असा सिनेमा आहे. ‘सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट’ (Best Foreign Film) म्हणून नक्कीच ऑस्कर मिळवू शकेल. या सिनेमाच्या रूपाने सत्यजित रे व शेखर कपूर यांच्यानंतर नितेश तिवारी यांनी जागतिक चित्रपटसृष्टीमध्ये मोठी देणगी दिली आहे. प्रॉडक्शन डिझाईन आणि सिनेमॅटोग्राफी (DOP)साठी या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळतील आणि चित्रपटाचे खूप कौतुक होणार आहे,”
रणबीर कपूर व रणवीर सिंहची तुलना
पुढे ते म्हणाले, “रणबीर कपूर आता रणवीर सिंहच्या बरोबरीचा अभिनेता झाला असून, हे दोघेही आता नवे ‘धुरंधर’ कलाकार बनले आहेत, ज्यांना कोणी तोड देऊ शकणार नाही,” पुढे त्यांनी आता रणबीर कपूरला सल्ला दिला आहे. त्यांनी लिहिलं, “रणबीर, अभिनेता म्हणून तू नेहमीच माझ्या आवडीचा राहिला आहेस; पण आता भारताचा वारसा, संस्कृती, मूल्ये आणि परंपरा जपण्याची सामाजिक जबाबदारी तुझ्यावर असणार आहे. त्यामुळे यानंतर कितीही मोठी ऑफर मिळाली तरी पुन्हा ‘अॅनिमल’सारखे चित्रपट करू नकोस. तुझी भाषा कधीच वाईट होऊ देऊ नकोस. तुझ्या अभिनयासाठी भारतीय संस्कृतीमध्ये अशा अनेक कथा आहेत.”
म्हणून मी हा सिनेमा पाच वेळा बघणार – नितीश भारद्वाज
पुढे त्यांनी साई पल्लवीच्या भूमिकेबाबतही अपेक्षा व्यक्त केल्या. नितीश भारद्वाज म्हणाले, “भारतीय प्रेक्षक साई पल्लवीला सीतेच्या भूमिकेत स्वीकारतील, अशी मला आशा आहे. या चित्रपटात तुलसीदासांच्या चौपाया ऐकायला मिळाव्यात, अशीही माझी इच्छा आहे. कारण- प्रत्येक भारतीयाच्या मनात महाकाव्य ‘रामायण’ची हीच खरी ओळख आहे. नितेशने या भव्य कलाकृतीसाठी खूप कष्ट केले आहेत, त्यांचा आदर म्हणून मी तरी ‘रामायण’ सिनेमा पाच वेळा नक्कीच पाहणार आहे.”
