भारतात १९९९ साली एका तरुणीची हत्या झाली होती. या हत्याप्रकणात काँग्रेस नेत्याचा मुलगा दोषी होता, पण ट्रायल कोर्टाने त्याची निर्दोष मुक्तता केली आणि विरोध करायला देशभरातील लोक रस्त्यावर उतरले होते. नंतर या हत्याकांडावर चित्रपट बनवण्यात आला होता. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. हे प्रकरण नेमकं काय आणि तो चित्रपट नेमका कोणता होता, ते जाणून घेऊयात.
२९ एप्रिल १९९९ च्या रात्री दिल्लीच्या मेहरौली परिसरातील एका हाय-प्रोफाइल रेस्टॉरंटमध्ये एक प्रायव्हेट पार्टी सुरू होती. मॉडेल असलेली जेसिका लाल तिथे बारमेड म्हणून काम करत होती. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दारू संपली आणि बार बंद झाला. दरम्यान, हरियाणातील काँग्रेस नेते वेनोद शर्मा यांचा मुलगा मनु शर्मा त्याच्या मित्रांसह आला. त्याने जेसिकाला दारू आणायला सांगितलं. पण जेसिकाने नकार दिला. त्यानंतर संतापलेल्या मनु शर्माने आधी हवेत गोळी झाडली आणि नंतर जेसिकाच्या डोक्यात गोळी झाडली. जेसिकाला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
३ ऑगस्ट १९९९ रोजी मनु शर्मा आणि इतर आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. पण, २००१ साली अनेक महत्त्वाच्या साक्षीदारांनी आपले जबाब बदलले. त्यामुळे फेब्रुवारी २००६ मध्ये, पुराव्याअभावी ट्रायल कोर्टाने मनु शर्माला निर्दोष मुक्त केलं. या निर्णयाने देशाला धक्का बसला. दिल्लीसह अनेक शहरांमध्ये लोक रस्त्यावर उतरले. माध्यमं, सामान्य जनता आणि सामाजिक संघटनांच्या दबावामुळे हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचले. डिसेंबर २००६ मध्ये, उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाचा निर्णय रद्द केला आणि मनु शर्माला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
खऱ्या घटनेवर आधारित ‘नो वन किल्ड जेसिका’ चित्रपट
या घटनेवर बॉलीवूडमध्ये चित्रपट बनवण्यात आला. ‘नो वन किल्ड जेसिका’ असं या चित्रपटाचं नाव. हा चित्रपट २०११ मध्ये रिलीज झाल्यावर जेसिका लाल प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं होतं. राणी मुखर्जी आणि विद्या बालन यांच्या दमदार अभिनयाने हा चित्रपट प्रचंड गाजला होता.
मनु शर्मा कुठे आहे?
जवळजवळ १५ वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर, मनु शर्माची २०२० मध्ये चांगल्या वागणुकीमुळे सुटका करण्यात आली. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्याने आपलं नाव बदलून सिद्धार्थ शर्मा असं ठेवलं. आता तो पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज अंतर्गत डिस्टिलरी व्यवसाय चालवतोय. त्याचा सिंगल माल्ट व्हिस्की ब्रँड Indri भारतातील सर्वाधिक विकला जाणारा भारतीय सिंगल माल्ट बनला आहे. या कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये Indri मधून ८०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली.
जेसिका लाल हत्या प्रकरण प्रचंड गाजलं होतं. या प्रकरणाने एक सिद्ध केलं की जर लोकांनी एकत्र येऊन विरोध केला, तर सर्वात शक्तिशाली व्यक्ती देखील कायदेशीर कारवाईपासून वाचू शकत नाही.
