Amitabh Bachchan and Govinda: अमिताभ बच्चन आणि गोविंदा हे बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकार आहेत. बॉलीवूडचा अँग्री यंग मॅन म्हणून अमिताभ बच्चन यांची ओळख निर्माण झाली; तर गोविंदाच्या विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्यांच्या डान्सच्या अनोख्या स्टाइलचा चाहतावर्ग निर्माण झाला.

अमिताभ बच्चन आणि गोविंदा हे दोन्ही कलाकार असे आहेत, ज्यांनी त्यांच्या कारकि‍र्दीत खूप चांगला काळ पाहिला आणि खूप वाईटही काळ पाहिला. अमिताभ बच्चन यांनी ९० च्या मध्यात चित्रपटसृष्टीपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. ते जे काही करण्याचा प्रयत्न करत होते, त्यामध्ये त्यांना यश मिळत नव्हते. त्यांची अँग्री यंग मॅनची प्रतिमा फिकट झाली. वादग्रस्त आणि अल्पकालीन राजकीय कारकिर्दीने त्यांच्या अडचणींमध्ये भर पडली.

एकीकडे अमिताभ बच्चन सतत अपयशाचा सामना करत असताना दुसरीकडे एक अभिनेता यशाच्या शिखरावर होता. गोविंदा त्याच्या विनोदाच्या अचूक टायमिंग आणि डान्समधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होता. गोविंदाने ९० च्या दशकात बॉलीवूडवर वर्चस्व गाजवले. याचदरम्यान अमिताभ बच्चन यांनी पुनरागमन करण्याचा विचार केला. त्यांनी डेव्हिड धवन यांच्या ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पुनरागमन करण्याचे ठरवले. या चित्रपटात गोविंदादेखील प्रमुख भूमिकेत होता.

“त्यावेळी मी लोकांचा वेडेपणा…”

१९९८ ला ‘बडे मियां छोटे मियां’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. मात्र, याचदरम्यान अमिताभ बच्चन यांना याची जाणीव झाली की त्यांची लोकप्रियता कमी झाली आहे.

अमिताभ बच्चन यांनी २०१६ ला पत्रकार राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत याबद्दल वक्तव्य केले होते. ते म्हणालेले, “संपूर्ण समीकरण बदलते, गर्दी तुमच्याकडे पूर्वीप्रमाणे आकर्षित होत नाही. लोक तुमच्याकडे पूर्वीसारखे पहात नाहीत. एक काळ असा असतो की तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला पाहण्यासाठी लोक गोंधळ करू शकतात. एक काळ असाही असतो की कोणीही तुमच्याकडे पहात नाही.”

‘बडे मियां छोटे मियां’ चित्रपटादरम्यानचा किस्सा सांगत अमिताभ बच्चन म्हणालेले, “मी ‘लावारिस’ आणि ‘मुक्कदर का सिंकदर’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी न्यूयॉर्कला गेलो होतो, त्यावेळी मी लोकांचा वेडेपणा पाहिला होता. त्या गर्दीतून बाहेर पडणे अशक्य होते. जरी स्टेजवर आपण असलो, तरी त्या गर्दीतून बाहेर पडणे अशक्य होते. पण, जेव्हा मी अनेक वर्षांनंतर गोविंदा आणि रवीनासोबत एका चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी गेलो तेव्हा अनुभव खूप वेगळा होता. कोणीही पाहिले नाही. प्रेक्षकांमधील एक असल्यासारखे वाटत होते, त्यामुळे हा फरक कळतो.”

बिग बींनी एकदा मुव्ही मॅगझीनला एक किस्सा सांगितलेला. ते म्हणालेले, “”हम’ चित्रपटाचे मी आणि गोविंदा शूटिंग करत होतो. त्यावेळी काही तरुण मुलांचा घोळका आला. त्यातील एक मुलगा माझ्याजवळ आला आणि मला ऑटोग्राफसाठी विचारले. गोविंदा माझ्याजवळच उभा होता. त्या घोळक्यात एक मुलगी होती. तिने गोविंदाला पाहिले आणि त्या मुलाला म्हणाली की, त्यांचा नाही गोविंदाचा ऑटोग्राफ घे.”

दरम्यान, सध्या गोविंदाची प्रकृती बिघडल्याने अभिनेता चर्चेत आहे.