Nora Fatehi in NCW on Sarke Chunar Controversy : बॉलीवूड डान्सर व मॉडेल नोरा फतेही ही तिच्या दिलखेचक अदा आणि दमदार नृत्याने नेहमीच चर्चेत असते. अनेक सुपरहिट गाण्यांमधून तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र ‘केडी द डेव्हिल’ या चित्रपटातील ‘सरके चुनर’ गाण्यामुळे नोरा वादाच्या भोवऱ्यात अडकली. अतिशय अश्लील गीत असलेल्या या गाण्यावर चौफेर टीका झाल्यानंतर नोरा फतेही राष्ट्रीय महिला आयोगासमोर उत्तर देण्यासाठी आली आहे. वादग्रस्त गाण्यामुळे निर्माण झालेल्या वादाला नोराला सामोरे जावे लागणार आहे.
KD The Devil या चित्रपटातील ‘सरके चुनर’ गाण्यावरून समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. या गाण्यातील शब्दांवर आक्षेप घेऊन, अश्लीलतेचा कळस गाठल्याची टीका करण्यात आली होती. त्याची राष्ट्रीय महिला आयोगाने याची दखल घेतली. संबंधित कलाकारांना याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. यामध्ये अभिनेता संजय दत्त याचादेखील समावेश आहे. आता नोरा फतेही हिनेदेखील महिला आयोगासमोर तिची बाजू मांडली आहे. तसेच घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे.
“‘सरके चुनर’ या वादग्रस्त गाण्याच्या प्रकरणावर राष्ट्रीय महिला आयोगाने एक सुनावणी ठेवली. या संदर्भात अभिनेत्री नोरा फतेही हिला समन्स बजावण्यात आले असून ती आयोगासमोर उपस्थित राहिली आहे. याआधी झालेल्या सुनावणीच्या वेळी नोरा परदेशामध्ये असल्यामुळे अनुपस्थित होती. त्यावेळी नवीन तारीख देण्याची मागणी नोराने केली होती.
नोरा फतेहीने मागितली माफी
सरके चुनर या गाण्यावरुन पार पडलेल्या सुनावणीमध्ये नोरा फतेही हिने माफीनामा दिला. तसेच कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे देखील ती म्हणाली आहे. नोरा फतेही म्हणाली, “मी आयोगाची माफी मागितली आहे. एक कलाकार म्हणून मला माझी जबाबदारी समजली पाहिजे. हे लक्षात घेऊन, मी काही अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे.”
नोरा फतेही हिने सरके चुनर या गाण्याच्या वादामधून स्वतःला अलिप्त ठेवले होते. तिने चित्रित केलेले गाणे कन्नड होते आणि त्याचे हिंदीमध्ये डबिंग करताना तिची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच या गाण्याच्या हिंदी गीताबद्दल तिला कोणतीही माहिती नव्हती, अशी प्रतिक्रिया नोराने यापूर्वी दिली आहे.
संजय दत्त करणार ५० आदिवासी मुलींच्या शिक्षणाचा खर्च
सरके चुनर गाण्यावरून निर्माण झालेल्या वादासंदर्भात अभिनेता संजय दत्त यानेही NCW (राष्ट्रीय महिला आयोग)समोर हजेरी लावली. तसेच, ‘अनावधानाने’ झालेल्या समाजाच्या हानीबद्दल खेद व्यक्त करीत लेखी माफीनामा सादर केला. तसेच सुधारणात्मक उपाय म्हणून सामाजिक कल्याण आणि महिला सक्षमीकरणाचा एक भाग म्हणून ५० आदिवासी मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची हमी संजय दत्त याने दिली.
