Nora Fatehi Sarke Chunar Controversy : अभिनेत्री नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्यावर चित्रित झालेल्या ‘सरके चुनर’ या गाण्यामुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘केडी : द डेविल’ या चित्रपटातील हे गाणं आहे. या गाण्याचे बोल अत्यंत अश्लील आणि दुहेरी अर्थाचे आहेत. यामुळे सर्व स्तरातून या गाण्यावर टीका करण्यात येत आहे. या गाण्याचा वाद थेट संसदेपर्यंत पोहोचला होता. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी या वादग्रस्त ‘सरके चुनर’ गाण्यावर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती दिली.

या गाण्यात झळकलेल्या अभिनेत्री नोरा फतेही अखेर या संपूर्ण वादावर अखेर मौन सोडलं आहे. या गाण्याचं चुकीचं भाषांतर केलं गेलं आणि नोराने हे गाणं कन्नडमध्ये चित्रित केलं होतं. त्यानंतर परवानगीशिवाय या गाण्याचं हिंदीत भाषांतर करण्यात आलं असं सांगत नोराने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

नोरा फतेही म्हणाली, “सरके चुनर या गाण्यामुळे जो काही वाद निर्माण झालाय…त्याविषयी आता मी बोलणार आहे. खरंतर, माझ्या कुटुंबात एका जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्यामुळे मी काही दिवस कोणाच्याही संपर्कात नव्हते. त्यामुळे नेमकं काय सुरू होतं हे मलाही माहिती नव्हतं. आता काही गोष्टी मी स्पष्ट करू इच्छिते. मी हे गाणं तीन वर्षांपूर्वी कन्नड भाषेत शूट केलं होतं. तेव्हा मी होकार दिला होता कारण, अर्थात यामध्ये अभिनेते संजय दत्त झळकणार होते. आता एवढ्या मोठ्या अभिनेत्याबरोबर काम करायला कोणाला नाही आवडणार? म्हणून मी या गाण्यासाठी तयार झाले.”

नोरा पुढे म्हणाली, “आता या गाण्याचं भाषांतर काय होणार…हे सगळं निर्मात्यांवर अवलंबून होतं. मला कन्नड समजत नाही, त्यामुळे निर्माते जे काही सांगत होते त्यावर मी विश्वास ठेवत होते. आता त्यांनी त्याच गाण्याचं हिंदीमध्ये डबिंग केलंय…या गाण्याचे बोल खरंच खूप जास्त वाईट आहेत. मला याची काहीच कल्पना नव्हती. त्यांनी माझी परवानगी सुद्धा घेतली नव्हती किंवा मला कळवलंही नव्हतं. जेव्हा मला लॉन्च इव्हेंटसाठी आमंत्रित करण्यात आलं, तेव्हा मला हे सगळं समजलं.”

“निर्मात्यांनी माझ्या परवानगीशिवाय हिंदी लिरिकल व्हिडिओ बनवला. त्यानंतर त्यांनी माझा आणि संजय दत्त यांचा एआय-जनरेटेड फोटो तयार केला. मी आधीपासूनच एआयच्या विरोधात आहे. मला त्या लॉन्च कार्यक्रमात सुद्धा हे सगळं पाहून त्रास झाला होता. मला थोडंफार हिंदी समजतं…ज्यावेळी लॉन्च इव्हेंटला मी ते हिंदी गाणं पाहिलं तेव्हाच मला समजलं की हे अतिशय चुकीचं आहे. मी दिग्दर्शकाला सुद्धा ‘हे बरोबर नाहीये, यामुळे प्रचंड टीका होणार’ हे सांगितलं होतं. यामुळे माझ्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माझ्यासारख्या कलाकारांना या इंडस्ट्रीत सहज कोणाचाही पाठिंबा मिळत नाही. मी काय नेपोकिड वगैरे नाहीये…त्यामुळे मला पाठिंबा देणारे फक्त माझे प्रेक्षक आणि माझे चाहते आहेत. सुदैवाने, मी भाग्यवान आहे की, आजवर मी बॉलीवूडमध्ये अशा लोकांबरोबर काम केलं आहे जे माझ्या मतांचा आदर करतात. माझं ऐकून घेतात. मात्र, काही इंडस्ट्रीमध्ये आमचं कोणीही ऐकत नाही. त्यांना माझ्या मतांची पर्वा नसते.” असं नोराने स्पष्ट केलं आहे.

शेवटी नोरा सर्वांना विनंती करत म्हणाली, “हे गाणं कुठेही शेअर करू नका…विनाकारण या गाण्याला प्रसिद्धी देऊ नका. तुमच्यापैकी काहीजण मला चारित्र्यावरून बोलत आहेत…हे अतिशय वाईट आहे. मी आणि माझी टीम भविष्यात कोणत्याही प्रोजेक्टबाबतीत अधिक काळजी घेऊ. मला पुन्हा एकदा स्पष्ट करायचं आहे की, मला या हिंदी गाण्याबद्दल काहीही माहिती नव्हतं, मी त्यावर सादरीकरण केलेलं नाहीये.”