Bollywood Controversial Songs : बॉलीवूडच्या गाण्यांमध्ये हळूहळू बदल होत गेले. बॉलीवूडच्या चित्रपटांत तसेच गायक-संगीतकारांच्या स्वतंत्र अल्बम्समधून आयटम साँग, रॅप आणि पॉप गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यात आक्षेपार्ह शब्दांचा आणि शिव्यांचा सर्रास वापर होऊ लागला, ज्यामुळे अनेकदा वाद झाले.
नुकतेच नोरा फतेही आणि संजय दत्तचे एक गाणे समोर आले आहे, ज्यामुळे सध्या वाद सुरू आहे. ‘सरके चुनर तेरी सरके’ या ‘केडी- द डेविल’ या कन्नड चित्रपटातील हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून त्यावर बरीच टीका होत आहे. या गाण्याचे शब्द आणि कोरिओग्राफी अश्लील असल्याचा आरोप केला जात आहे.
नोरा फतेही आणि संजय दत्तच्या या वादग्रस्त गाण्याआधीसुद्धा अनेकदा गाण्यांवरून असे वाद झाले आहेत. चला जाणून घेऊ, अशा काही वादग्रस्त गाण्यांबद्दल ज्यामुळे वाद झाले होते.
१. सरके चुनर तेरी सरके (Sarke Chunar Teri Sarke)
‘केडी : द डेव्हिल’ या चित्रपटातील नोरा फतेही आणि संजय दत्तवर चित्रित झालेल्या या गाण्यावर सध्या प्रचंड टीका होत आहे. त्यातील कोरिओग्राफी आणि आक्षेपार्ह शब्दांमुळे सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार करण्यात आली, ज्यानंतर या गाण्याचे हिंदी व्हर्जन प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आले.
२. नागन (Naagan) – हनी सिंग
हनी सिंगच्या या गाण्यावर अश्लीलतेचा आरोप करण्यात आला. जालंधरमधील एका नेत्याने हे गाणे पंजाबी संस्कृतीला घातक असल्याचे सांगत एफआयआर (FIR) दाखल करण्याची मागणी केली होती.
३. मिलियनेयर (Millionaire) – हनी सिंग
२०२५ मध्ये ‘ग्लोरी’ अल्बममधील या गाण्यामुळे हनी सिंग पुन्हा वादात सापडला. महिला आयोगाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत, गाण्यातील आशयावर तपास करण्याचे आदेश दिले.
४. मुन्नी बदनाम हुई (Munni Badnaam Hui)
२०१० मध्ये सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटातील ‘मुन्नी बदनाम हुई’ गाणे कायदेशीर वादात अडकले होते. या गाण्यात काही विशिष्ट शब्दांचा गैरवापर केल्याचा दावा करण्यात आला होता.
५. दम मारो दम (Dum Maaro Dum)
२०११ मध्ये दीपिका पादुकोणवर चित्रित झालेल्या या गाण्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झाला होता. या निमित्ताने झीनत अमान यांच्या मूळ गाण्यातील ‘ड्रग्ज’च्या संदर्भाचा वादही पुन्हा चर्चेत आला होता.
६. कॅन्डी शॉप (Candy Shop) – नेहा आणि टोनी कक्कर
डिसेंबर २०२५ मध्ये आलेल्या या गाण्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. पाश्चात्त्य पॉप संस्कृतीची चुकीच्या पद्धतीने नक्कल केल्यामुळे प्रेक्षकांनी याला ‘अश्लील’ गाणे म्हटले.
७. एमएफ गबरू (MF Gabhru) – करण औजला
महिलांविषयी अपशब्द वापरल्याच्या आरोपावरून पंजाब प्राधिकरणाने या गाण्याची चौकशी केली. इंटरनेटवर हे गाणे गाजत असले तरी गायक करण औजलाला आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.
८. ततीरी (Tateeree) – बादशाह
मार्च २०२६ मध्ये प्रदर्शित झालेल्या बादशाहच्या या हिप-हॉप गाण्यावर अश्लील शब्दांमुळे टीका झाली. हरियाणा राज्य महिला आयोगाने यावर आक्षेप घेत, बादशहाने अल्पवयीन मुलांचा वापर केल्याबद्दल नोटीस बजावली. अखेर या प्रकरणी बादशाहने व्हिडीओ शेअर करीत माफी मागितली.
९. सिरा (Sirra) – गुरू रंधावा
या गाण्यातील ‘गुडती’ या शब्दावरून कायदेशीर वाद निर्माण झाला. हा शब्द सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्याचे सांगत न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली, ज्यामुळे गुरूला कोर्टाचे समन्स बजावण्यात आले.
१०. भाग डी.के. बोस (Bhaag D.K. Bose)
आमिर खानची निर्मिती असलेल्या ‘दिल्ली बेली’मधील या गाण्यातील शब्दांमुळे मोठा गदारोळ झाला होता. शिवीसारख्या वाटणाऱ्या या शब्दांमुळे तरुण पिढीवर वाईट परिणाम होईल, असा दावा करत यावर कायदेशीर कारवाईची मागणी झाली होती.
