Sarke Chunar Teri Sarke Song Controversy अभिनेत्री नोरा फतेही ही तिच्या बॅले डान्ससाठी ओळखली जाते. आत्तापर्यंत तिने विविध गाण्यांमध्ये हे नृत्य केलं असून तिला अमाप प्रसिद्धीही मिळाली आहे. मात्र सध्या प्रदर्शित झालेलं एक गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्यावर चित्रित झालेल्य गाण्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर लोक या गाण्यावर प्रतिक्रिया देत आहेत आणि या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत.
काय आहे वाद?
सरके चुनर तेरी सरके हे गाणं युट्युबवर प्रदर्शित कऱण्यात आलं आणि युट्युब, एक्स या सगळ्या ठिकाणी या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. सेवा न्याय उत्थान फाऊंडेशनच्या संस्थापक स्वाती गोयल यांनी एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्यांनी हे गाणं पोस्ट केलं असून यातले शब्द हे खूपच अश्लील आणि उथळ आहेत असं म्हटलं आहे. तसंच अशा गाण्यांना सेन्सॉर मंजुरी कसं काय देतं असाही सवाल त्यांनी केला आहे. या गाण्याचे शब्द इतके अश्लाघ्य आहेत की ते बातमीत लिहिणंही लाज आणणारं आहे. नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. हे गाणं रिलिज झाल्यानंतर लगेचच हा वाद सुरु झाला आहे.
स्वाती गोयल यांची पोस्ट नेमकी काय?
आम्ही या अश्लाघ्य गाण्याविरोधात तक्रार करत आहोत. अशा प्रकारचं गाणं सेन्सॉरने मान्य कसं काय केलं? गाण्यातील शब्दांचा लहान मुलांवर आणि तरुणींवर काय परिणाम होईल याचा विचार केलाय का? आपण बलात्काराची वृत्ती रुजवायची आहे का? प्रत्येकाने या असल्या गाण्याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. या आशयाची पोस्ट स्वाती गोयल यांनी लिहिली आहे.

सरके चुनर हे कुठल्या चित्रपटातील गाणं आहे?
सरके चुनर तेरी सरके हे केडी-द डेव्हिल या चित्रपटातील गाणं आहे. या गाण्यात असे शब्द वापरले आहेत की ते अत्यंत घाणेरडे, द्वयर्थी आणि अश्लील आहेत. त्यामुळे संजय दत्त, नोरा फतेही यांच्यासह गाणं ज्याने लिहिलं आहे त्याच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी केली जाते आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलमध्ये या गाण्याच्या विरोधात तक्रार केली गेली आहे. सोशल मीडियावरही या गाण्याबाबत लोक व्यक्त होत आहेत. हे गाणं अश्लीलता पसरवणारं आहे असं अनेक लोकांनी म्हटलं आहे.
सामाजिक कार्यकर्ते विनीत जिंदगी यांची दिल्ली पोलिसात तक्रार
या गाण्याविरोधात विनीत जिंदगी यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी ही देखील मागणी केली आहे की संजय दत्त, नोरा फतेही आणि गीतकार रकीब आलम तसंच चित्रपटाचे दिग्दर्शक प्रेम यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जावी. कलम २९४ च्या अंतर्गत ही कारवाई केली जावी अशीही मागणी करण्यात आली आहे. केडी द डेव्हिल हा कन्नड सिनेमा आहे. हा चित्रपट ३० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ध्रुव सरजा महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तर शिल्पा शेट्टी, व्ही रविंचंद्रन यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात आहेत.
सरके चुनर हे गाणं कुणी लिहिलं आहे?
सरके चुनर हे गाणं रकीब आलम या गीतकाराने लिहिलं आहे. रकीब आलम हे दाक्षिणात्य चित्रपटांसाठी हिंदी गाणी लिहिण्याचं काम करतात. पुष्पा द रुल, कुबेरा, लियो, वाथी, विक्रम, वाथी अशा चित्रपटांसाठी हिंदी गाणी लिहिली आहेत. सरके चुनर गाणं सुरुवातीपासूनच प्रचंड अश्लील आहे असं लोक म्हणत आहेत. असं गाणं लिहिल्यानंतर आता रकीब आलम यांच्यावरही लोक टीका करत आहेत.
गायक अरमान मलिकची गाण्यावर जोरदार टीका
गायक अरमान मलिकने या गाण्यावर टीका केली आहे. अरमान म्हणतो, हे गाणं जेव्हा माझ्या टाइमलाइवर आलं तेव्हा मला सुरुवातीला विश्वासच बसला नाही. मला वाटलं की मी चुकीचं तर गाणं ऐकलं नाही ना? त्यामुळे मी हे गाणं पुन्हा ऐकलं तेव्हा समजलं की गाणं गलिच्छ आहे. व्यावसायिक गाण्यांचा दर्जा इतका खालवला आहे.
लोक काय म्हणत आहेत?
हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात घाणेरडं गाणं असं लोक या गाण्याबाबत म्हणत आहेत. रकीब आलम यांना हे गाणं लिहिताना काहीच लाज वाटली नसेल का असाही प्रश्न एक्स प्लॅटफॉर्मवर नेटकरी विचारत आहेत. तसंच लिहिणाऱ्याने गाणं लिहिलं, त्याला चाल लावणाऱ्याने चालही लावली पण जे दोन अॅक्टर या गाण्यावर नाचत आहेत त्यांना याचे बोल कसे काय चालले? त्यांना हे गाणं कुठेही खटकलं नाही का? असा प्रश्नही लोक विचारत आहेत. तसंच लोकांनी यावरुन सेन्सॉर बोर्डालाही प्रश्न विचारले आहेत. सेन्सॉर बोर्डाने या गाण्यावर आक्षेप का घेतला नाही? दरम्यान काही लोक असंही म्हणत आहेत की युट्युब किंवा सोशल मीडियावर काय प्रदर्शित केलं जावं याच्या मर्यादा आखून देण्याचं काम सेन्सॉर बोर्ड करत नाही. हे गाणं चित्रपटगृहांमध्ये वाजलं तर मात्र या गाण्याची जबाबदारी सेन्सॉर बोर्डाकडे असेल. दरम्यान हे गाणं इंटरनेट आणि सोशल मीडियावरुन हटवण्यात यावं अशी मागणीही शेकडो नेटकरी करत आहेत.
