Bollywood Actors Who Died In Plane Crash: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. बारामतीत झालेल्या या अपघातानंतर पवार कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली.

याआधीही विमान अपघातात अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. त्यामध्ये सिनेसृष्टीतील काही कलाकारांचादेखील समावेश आहे. आज आपण त्या कलाकारांबद्दल जाणून घेऊ…

सौंदर्या

१९९९ मध्ये प्रदर्शित झालेला सूर्यवंशम हा चित्रपट खूपच मोठ्या प्रमाणात गाजला. या चित्रपटातील गोष्टीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यामध्ये अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत दिसले. विशेष म्हणजे त्यांची दुहेरी भूमिका या चित्रपटात पाहायला मिळाली. सिनेमातील इतर कलाकारांनीही त्यांच्या भूमिकांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली.

या चित्रपटात राधा सिंग ही भूमिका अभिनेत्री सौंदर्याने साकारली होती. १७ एप्रिल २००४ रोजी अभिनेत्री बंगळुरूमधून करीमनगरला चालली होती. बंगळुरूच्या जक्कुर विमानतळावरून विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटानंतर लगेचच विमानाला आग लागली आणि विमानाचा अपघात झाला. या अपघातात अभिनेत्रीचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा हा अपघात झाला, त्यावेळी सौंदर्या सात महिन्यांची गर्भवती होती. तिच्याबरोबरच या विमानात तिचा भाऊ अमरनाथ, भाजपा कार्यकर्ता रमेश कदम आणि पायलट जॉय फिलिप्सदेखील होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला.

सौंदर्याने अनेक तेलुगू चित्रपटांत काम करीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. ज्यावेळी तिचा मृत्यू झाला, त्यावेळी तिचे वय ३२ होते.

इंदर ठाकूर

१९८२ ला प्रदर्शित झालेला नदियाँ के पार हा चित्रपट आठवतोय? सचिन पिळगांवकर आणि साधना सिंग हे या चित्रपटात प्रमुख भूमिकांत दिसले होते. सचिन पिळगांवकर यांनी चंदन ही भूमिका साकारली होती; तर अभिनेत्री साधना सिंग या गुंजा या भूमिकेत दिसल्या होत्या. चंदनचा मोठा भाऊ ओंकार ही भूमिका अभिनेते इंदर ठाकूर यांनी साकारली होती. इंदर ठाकूर यांना या भूमिकेतून मोठी लोकप्रियता मिळाली होती.

इंदर ठाकूर यांचा मृत्यूदेखील विमान अपघातात झाला. ते पत्नी आणि मुलांसह लंडनला चालले होते. त्यावेळी झालेल्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. २३ जून १९८५ ला हा अपघात झाला होता.

इंदर ठाकूर यांनी अभिनयाबरोबरच मॉडेल, तसेच फॅशन डिझायनर म्हणूनदेखील काम केले. हीरो, तुलसी या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकादेखील लोकप्रिय ठरल्या होत्या.

तरुणी सचदेव

तरुणी सचदेव ही बालकलाकार होती. तिने अमिताभ बच्चन यांच्याबरोबर पा चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातून तिला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती.

१४ मार्च २०१२ रोजी नेपाळच्या विमानतळाजवळ तिचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यावेळी तिचा १४ वा वाढदिवस होता. तिच्याबरोबर तिच्या आईचादेखील त्या अपघातात मृत्यू झाला होता.