बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली हे मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानले जातात. अलीकडेच विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत करत आयपीएल २०२६चे विजेतेपद पटकावले. त्यानंतर विराट आणि अनुष्का यांनी प्रेमानंद महाराज यांच दर्शन घेतलं. दरम्यान, अनुष्काच्या मोबाईलच्या वॉलपेपरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं असून त्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
अनुष्का शर्मा खूप आध्यात्मिक असल्याचं एकूणच तिने आतापर्यंतच्या प्रेमानंद महाराजांबरोबर साधलेला संवाद आणि गळ्यातील तुलशीची माळ, जप यावरुन कळतं. त्यामुळे नवऱ्याच्या विजयानंतर ती प्रेमानंद महाराजांची भेट घेण्याकरता गेली असताना त्यावेळचे तिचे व विराटचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले. प्रेमानंद महाराजांची भेट घेतल्यानंतर परतत असताना विमानतळावरील अनुष्काचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच कारण म्हणजे तिच्या फोनवरील वॉलपेपेर.
कोणाचा फोटो आहे अनुष्काच्या वॉलपेपरवर?
अनुष्काच्या फोनवरील वॉलपेपरबद्दल बोलायचं झालं तर तिच्या फोनवर तिचा नवरा विराट किंवा तिची दोन मुलं वामिका आणि अकाय यांचे फोटो नसून प्रेमानंद महाराजांचा फोटो असल्याचं या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. अनुष्काच्या फोनचा वॉलपेपर पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनी या व्हिडीओखाली राधे राधे अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. पण काहींनी अभिनेत्रीवर टीकासुद्धा केली आहे.
विशेष म्हणजे, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे अनेकदा वृंदावन येथे जाऊन प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेतात. या दाम्पत्याने त्यांच्याकडून गुरुदीक्षाही घेतली आहे. त्यानंतर अनुष्का आणि विराट यांनr अनेकदा गळ्यात तुळशीची माळ घातलेली पाहायला मिळालं आहे. अनुष्का आणि विराट यांनी ११ डिसेंबर २०१७ रोजी इटलीतील टस्कनी येथे लग्न केलं होतं. या लोकप्रिय जोडप्याला वामिका नावाची मुलगी आणि अकाय नावाचा मुलगा आहे.
अनुष्का अनेकदा विराटच्या क्रिकेट सामन्यांना हजेरी लावत असते. दोघांचेही स्टेडियममधील व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात आणि त्यांच्या केमिस्ट्रीचं अनेक जण कौतुक करत असतात.
